आठ दिवस गावात फिरला कोरोनाचा रुग्ण : आता बलसूर गाव सील, उस्मानाबादेत घबराट

Osmanabad News
Osmanabad News

उमरगा : उमरगा तालुक्यातील बलसूर गावातील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. बुधवारी (ता. एक) एक तरुण व त्याच्या पत्नीचा स्वॅब तपासणीसाठी पूणे येथे पाठविण्यात आला होता. गुरुवारी (ता.दोन) रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. 

दरम्यान तो कोरोना बाधित तरूण गावात येऊन आठ दिवस झाले होते, पानिपतहुन आल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याची नोंद घेतली होती. मात्र उपजिल्हा रुग्णालयात तात्पूरत्या उपचारानंतर तो गावात फिरल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये कमालिची भिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारात प्रशासन बलसूर गाव सिल करण्यासाठी गेले होते.

उमरगा शहर व तालुक्यात महसूल, पोलिस व आरोग्य विभागाने कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृतीसाठी चांगले काम सुरू केले होते. ३१ मार्चपर्यंत दाखल झालेल्या ३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र बुधवारी दाखल झालेल्या बलसूर येथील एका तरुणाच्या पॉझिटिव्ह अहवालाने शहरासह तालुक्यातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. 

वृत्तवाहिन्या, वृत्तपत्राच्या तातडीच्या ऑनलाईन वृत्त सर्वत्र गेले आणि शहरात एरव्ही रात्री दहा ते अकरापर्यंत फिरणाऱ्या नागरिकांनी घर गाठले. औषधी दुकानेही बंद झाली. दरम्यान त्या पॉझिटिव्ह रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात वैद्यकिय अधिक्षक डॉ. पंडीत पूरी, डॉ. विक्रम आळंगेकर यांच्यासह अन्य डॉक्टर्सनी तातडीने उपचार सुरू केले. महसूल व पोलिस प्रशासनानेही रुग्णालयाकडे धाव घेतली.

त्या तरुणाचा गाफिलपणा अंगलट आला ! 

तो तरुण सहलीसाठी गेल्याची माहिती सांगण्यात येत आहे. पानिपत मार्ग दिल्ली येथून तो बलसूर येथे २५ मार्चला आल्याची माहिती उपसरपंच अॅड. संतोष पाटील यांनी सांगितली, त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या यादीत घेण्यात आली. त्या तरुणाने पहिल्यांदा नेमके कुठून प्रवास केल्याची माहिती सांगितली नव्हती ; तरीही ग्रामपंचायतीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीला पाठविण्यात आले होते तेथे त्याने तपासणी केली, त्यावेळी त्याला फारसा त्रास जाणवत नसल्याने तापूरत्या औषधोपचार घेऊन तो गावाकडे परतला. 

वास्तविक बाहेरराज्यातून आल्याने त्याच वेळी त्याची वेगळी तपासणी झाली असती, तर योग्य निदान झाले असते अथवा तो किमान होम क्वारंटाईनमध्ये तरी राहिला असता. परंतू तसे घडले नाही. तरूण गाफिल राहिला आणि तो बलसूरात आठ दिवस फिरला. ज्यावेळी दिल्ली येथील कार्यक्रमाशी कांही लोकांचा संबंध जोडला जाऊ लागल्याने गावातील प्रमुख व्यक्तींनी त्याला तपासणीसाठी पाठविले होते. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

त्या तरुणाचे बलसूर येथे मिनी ए.टी.एम. व मोबाईलचे छोटे दुकान आहे, त्याचा दुसरा भाऊ दुचाकी दुरुस्तीचे काम करतो. दोन्ही व्यवसाय बंद असल्याने पानमटेरियलची विक्रीही ते करत असल्याने तो तरुण मावा सुपाऱ्याच्या पुड्या गावातील ग्राहकांना विकत होता. अशी माहिती सांगण्यात येते आहे. म्हणजे लोकांमध्ये त्यांचा संपर्क वाढल्याचे दिसते. त्यामुळे ग्रामस्थात कमालिची भिती निर्माण झाल्याने गुरूवारी रात्रीच गावात सन्नाटा पसरला. कांही लोकांनी शेतात जाऊन रहाण्याची तयारी सुरू केली होती.

संपर्कात आलेल्या लोकांचा सुरू केला शोध

तो तरुण गावात व परिसरात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे, त्यादृष्टीने प्रशासनाकडून शोध सुरू झाला असून त्या व्यक्तींचीही तपासणीही करणे गरजेचे आहे. बुधवारी रात्रीच प्रशासनाने त्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांना आणण्यासाठी दोन रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या होत्या. 

दरम्यान उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांची रात्री उशीरापर्यंत गावातील लोकांशी चर्चा सुरु होती. गाव सिल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली होती. दरम्यान या गावचे रहिवाशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार गावातील परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.

निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे, त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातोय. या पुढे गावात कुणीही प्रवेश करू नये याची खबरदारी घेतली जात आहे, शिवाय अनावधानाने संपर्कात आलेल्या लोकांनी या पुढे इतर लोकांच्या संपर्कात येता कामा नये. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरातील लोकांच्या तपासणी केली जाईल आणि आवश्यकतेनुसार स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. 
- संजय पवार, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com