पाण्यासाठी सभेतच ठिय्या

औरंगाबाद - पाणीप्रश्‍नावरून नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच शनिवारी ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद - पाणीप्रश्‍नावरून नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच शनिवारी ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्न गेल्या वर्षभरापासून विस्कळित झाला असून, अनेक भागांत पाच ते सहा दिवसांनंतर पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यातच नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. त्याचे पडसाद शनिवारच्या (ता.२०) सर्वसाधारण सभेत उमटले. एमआयएम व काँग्रेस नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठिय्या आंदोलन करून महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचे उपमहापौर व नगरसेवकदेखील आंदोलनात सहभागी झाले.  

महापालिकेची शनिवारी सकाळी ११.३० वाजता सभा सुरू झाल्यानंतर सभागृहनेते विकास जैन यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झालेला असताना दुसरीकडे वॉर्डातील दूषित पाणी बंद करणे, नवीन पाइपलाइन टाकण्याची छोटी-मोठी कामे होत नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर नगरसेविका संतप्त झाल्या. प्रत्येकाने तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी भाजपच्या मनीषा मुंडे आसनासमोर आल्याने त्यांना जागेवरून बोलावे, अशी सूचना महापौरांनी केली. त्यावर राजू शिंदे यांनी त्यांना मागे जायला का सांगता? असा प्रश्‍न केला व महापौरांनी असे चालणार नाही, प्रत्येकाला शिस्त पाळावीच लागेल, असे सांगत रागारागात सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. त्यानंतर एमआयएम, काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केले.

त्यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, माजी महापौर भगवान घडमोडे हेदेखील सहभागी झाले. वीस मिनिटे हे आंदोलन सुरू होते. या वेळी ‘महापौर हाय हाय’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणा सभागृहात देण्यात आल्या.

भाजपचा राग काढला एमआयएमवर 
सत्ताधारी असूनही भाजप नगरसेवक आंदोलनात सहभागी झाल्याने महापौर संतप्त झाले. वीस मिनिटांनंतर सभेला सुरवात होताच त्यांनी नगरसेवकांना जागेवर बसण्याचे आवाहन केले. या वेळी एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप केला. त्यावर महापौरांनी, पहिले तुम्ही जागेवर बसा; अन्यथा एक दिवसासाठी नगरसेवकपद रद्द करतो, अशा शब्दांत इशारा देत निर्णयही घेऊन टाकला. त्यानंतर हा निर्णय परत बदलण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com