नगरसेवक जफरला भिवंडीत अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

भिवंडी/औरंगाबाद - ट्रक, डम्पर या अवजड वाहनांची चोरी करून बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला रविवारी (ता.सहा) अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून, २१ ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती िभवंडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली.

भिवंडी/औरंगाबाद - ट्रक, डम्पर या अवजड वाहनांची चोरी करून बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला रविवारी (ता.सहा) अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून, २१ ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती िभवंडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली.

नारपोली पोलिस ठाण्यात एका ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखा करत होती. तपासात बुलडाणा येथे चोरीचा ट्रक आणि डम्परची नव्याने नोंदणी व विक्री करण्यात आल्याची माहिती पुढे  आली होती. त्यानंतर गत आठवड्यात बुलडाण्यातून पाच ट्रक जप्त करण्यात आले. त्यामुळे ही मोठी साखळी असल्याचे उघड झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरातमधून चोरलेल्या ट्रक, डम्परची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करण्यात आली. ही वाहने विविध भागांत विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बारा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २१ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याच्या अटकेने या प्रकरणातील राजकीय लागेबांधे उघड झाले आहेत. 

या प्रकरणात नागपूर येथील आरटीओ कारकून व एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक चोरीची बाईकही ताब्यात घेतली आहे. बाईकच्या डिक्कीत ट्रकची कागदपत्रे सापडली आहेत. ही कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीतील नारपोली पोलिसात ट्रकचोरीसंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नगरसेवकाच्या भावालाही अटक 
वाहनाच्या हेराफेरी प्रकरणात नगरसेवक शेख जफर याचा भाऊ शेख बाबर याला औरंगाबाद गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. तो आठ मेपर्यंत पोलिस कोठडीत आहे. कागदपत्रांची व वाहनांच्या क्रमांकांची हेराफेरी करून त्याने दोन वाहने विकली असे शेख बाबर सांगत असून अजून काही गुन्हे उघड होतील, अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.

बुलडाणा आरटीओतून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी झालेल्या पाच ट्रकची माहिती मिळवली. तेथील दोन आरटीओ एजंटसह, नागपूर आरटीओतील कारकुनाला ताब्यात घेतले. या टोळीने ट्रक, डम्परचे मूळ चेसीस नंबर, इंजिन नंबर नष्ट करून बनावट नंबरसह रंगरंगोटी केली. त्याआधारे औरंगाबाद येथील एमआयएम नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि त्याचा भाऊ बाबर शेख हे ग्राहकांची फसवणूक करत होते. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवक शेख जफर यास अटक केली. 
- शीतल राऊत, पोलिस निरीक्षक, िभवंडी (मुंबई)

Web Title: corporator jafar shaikh arrested crime