नगरसेवक सय्यद मतीन अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी (ता. १७) अटक करण्यात आली. शनिवारी (ता. १८) दुपारी त्याला सिटी चौक पोलिस ठाण्यात आणले. या मारहाण प्रकरणात भाजपच्या पाच नगरसेवकांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी (ता. १७) अटक करण्यात आली. शनिवारी (ता. १८) दुपारी त्याला सिटी चौक पोलिस ठाण्यात आणले. या मारहाण प्रकरणात भाजपच्या पाच नगरसेवकांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

‘बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलो नाही,’ असे म्हणत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या नगरसेवक सय्यद मतीन यास बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वॉर्ड १७ मध्ये उपचार घेत असलेल्या मतीनला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अटक करून कैदी वॉर्डात हलविले होते. घाटीतून शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सुटी झाल्यावर त्याला सिटी चौक पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर शासकीय दुखवटा असताना नियोजित सभेत प्रक्षोभक वक्तव्य, दंग्यास चिथावणी व अश्‍लील भाषेच्या वापराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मतीन समर्थकांनी शुक्रवारी स्कॉर्पिओसह दोन कारची तोडफोड केली. या प्रकरणी दुसरा गुन्हाही बाळू वाघमारे यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला होता. या दुसऱ्या गुन्ह्यात रोहिला गल्लीतील आणखी एकाला अटक करण्यात आली. मोहम्मद आवेज मोहम्मद सिद्धिकी असे संशयिताचे नाव आहे.

माजी जिल्हाध्यक्ष अटकेत
मतीन यास बेदम मारहाण झाल्याने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतेवेळी राडा करणाऱ्या व काही भागांत बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळ्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी कुरेशीला शुक्रवारी रात्री बेगमपुरा पोलिसांनी अटक केली.

गुन्हे दाखल झालेल्यांत यांचा समावेश
दरम्यान, मतीन यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी उशिरा त्याच्या जबाबावरून भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोघांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.

दोघांना पोलिस कोठडी
सय्यद मतीनला न्यायालयाने रविवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडी सुनावली. तर माजी नगरसेवक जावेद कुरेशी इसाक कुरेशीला शनिवारी (ता. १८) अटक करून न्यायालयात हजर केले असता कुरेशी याला मंगळवार (ता. २१) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी सय्यद मतीनला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीची मागणी करताना सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपी मतीन हा हिस्ट्रीशीटर आहे, याविरोधात विविध पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याने मोबाईलवरून संदेश पाठवून, फोन करून समर्थकांना उचकवले. त्यामुळे त्याच्या समर्थकांनी महापालिका परिसरातील दोन वाहनांची तोडफोड करून दोघांना गंभीर जखमी केल्याचा युक्तिवाद केला.

दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजला अलअमोदी यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.  जावेद कुरेशी याने घाटीत गोंधळ घातला; तसेच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच जावेदसह त्याच्या समर्थकांनी टाऊन हॉल परिसरात दबाव टाकत जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल प्रसन्नजित सातदिवे यांच्या फिर्यादनुसार जावेदसह १००-१५० समर्थकाविरोधात बेगमपुरा पोलिसांत विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला; तसेच शनिवारी जावेदला अटक करण्यात आली. 

आरोपी जावेद कुरेशीला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडीची मागणी करताना सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी युक्तिवाद केला. त्यावर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांनी जावेदला मंगळवारपर्यंत (ता. २१) पोलिस कोठडी सुनावली.
महापालिका परिसरात वाहनांची तोडफोड करणारा संशयित आवेज मोहंमद सिद्दिकी (३०, रोहिला गल्ली) यालाही सिटी चौक पोलिसांनी अटक केली. सिटी चौक, बेगमपुरा पुलिस ठाण्यात दाखल दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मतीन व जावेदसह त्यांच्या १०० ते १५० साथीदारांनाही आरोपी करण्यात आले आहे. 

Web Title: Corporator Sayyad Matin Arrested Crime