नांदेड : आरटीओ कार्यालयात ५५ लाखांचा भ्रष्टाचार

नांदेड : आरटीओ कार्यालयात ५५ लाखांचा भ्रष्टाचार

नांदेड : भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळख असलेल्या येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपालानेच हे कार्यालय पोखरून काढले. बनावट पावती बुकचा आधार घेत त्याने तब्बल ५५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे तपासणीत उघड झाले.

त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव पोलिसांकडून सुरू आहे. तो रोखपाल मात्र सध्या पोलिसांपासून तोंड लपवून बसला आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन नांदेड भागात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आहे. या कार्यालयात मागील काही वर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेला कनिष्ठ लिपिक तथा सहायक रोखपाल शेख जाकीर हुसेन मौलाना याच्याकडे खटला विभागाची शुल्क व तडजोड रक्कम स्वीकारण्याची व पावती देण्याची जबाबदारी होती. परंतु त्याने आपल्या कर्तव्यात कसूर करत १६ आॅक्टोबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान तडजोड शुल्क भरणा करून घेत असतांना जारी केलेल्या पावतीच्या तीन प्रती पैकी कार्यालयीन अभिलेखावर ठेवण्यात येणाऱ्या पावतीच्या तिसऱ्या प्रतीमध्ये वाहन चालकांकडून स्वीकारलेल्या दंडाच्या रक्कमेबाबत पावती पुस्तकात खोट्या नोंदी करून, शिवाय त्या नोंदी खऱ्या असल्याचे भासवून त्याच्या ताब्यातील शासनाच्या ५६ लाख नऊ हजार ५० रुपये रक्कम स्वीकारली.

यापैकी त्याने एक लाख ११ हजार १२७ रुपये शासन खाती जमा केले. उर्वरीत ५४ लाख ९७ हजार ९२३ रुपयाचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केला. ही बाब तपासणीत लक्षात आली. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहीत काटकर यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय रक्कमेचा अपहार यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचे सर्व कागदपत्रे जमा करण्यात येत असून अपहार करणारा आरोपी सध्या फरार झाल्याचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास फौजदार संगिता कदम या करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com