
Cotton Farmer : दरवाढ नाहीच! पांढरं सोनं कवडीमोल झाल्याने, आहे त्या दरात कापूस विक्री
नांदेड : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे भाव दिसागणिक घसरत आहेत. त्याचा परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होत असून, हे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. आतापर्यंत दर वाढीची प्रतीक्षा करून घरात भरून ठेवलेला कापूस आता आहे त्या दरातच विकावा लागत आहे.
जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ कापसाचे मोठे क्षेत्र आहे. विशळेषतः नगती पीक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देतात. त्या पाठोपाठ कापसाचा पेरा असतो. गेले दोन वर्षात कापसाचे दर वाढत असल्याने गत हंगामात कापसाचा पेरा अधिक झाला होता. परंतु, यावर्षी कापसाचे भाव दिवसागणिक घसरु लागल्याने उत्पादक शेतकरी अभूतपूर्व अडचणीत आले आहेत.
सद्यस्थितीत कापसाला किमान सहा हजार ७०० तर कमाल सात हजार ५६५ एवढा प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी कापसाला आठ हजार भाव होता. त्यावेशी शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. आता आहे त्याच भावात त्यांच्यावर विकण्याची वेळ आली आहे.
आहे त्या दरातच कापूस विकायला सुरुवात
कापसाला पांढरे सोने म्हटले जाते. एकेकाळी सोन्याच्या भावाशी स्पर्धा करणारा कापूस सध्या बाजारात कवडीमोल दराने विकला जातोय. काहीही झाले तरी कापसाला योग्य भाव आल्यानंतर कापूस विकायचा यावर शेतकरी ठाम होते.
शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी तब्बल चार महिने घरातच कापूस साठवून ठेवला होता. प्रतीक्षा करूनही बाजारात कापसाच्या दराला सात हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजाने आहे त्या दरातच कापूस विकायला सुरुवात केली आहे.
आज ना उद्या भाव वधारेल म्हणून अपेक्षेने कापूस हाती आल्याबरोबर साठवणुकीवर जोर दिला. दर दहा हजार रुपयांपलिकडे जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, या हंगामात कापसाचे दर वधारले तर नाहीच, उलट दर कमालीचे घसरत आहेत.
- वाल्मिकराव कापसे (कापूस उत्पादक शेतकरी, पासदगाव)