दिवाळीच्या तोंडावर कापूस दरात घसरण

कपाशी
कपाशी

गंगापूर (जि.औरंगाबाद) : खरीप हंगामाच्या प्रारंभी विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता कापूस दरातील घसरणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र खर्चापेक्षाही कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. यंदा सर्वदूर मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. परिणामी पेरणीची वेळ निघून गेल्याने कापसाच्या उत्पादकतेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. तालुक्‍यात यावर्षी सुमारे 64 हजार 846 हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. त्यातील 95 टक्के लागवड क्षेत्र हे कोरडवाहू आहे.

त्यानुसार, कापूस लागवड ही मॉन्सूनच्या पाण्यावर अवलंबून होती. कोरडवाहू लागवडीसाठी सहा ते 20 जून हा योग्य कालावधी आहे. पेरणीची वेळ साधली गेली, तर हेक्‍टरी पंधरा ते सोळा क्विंटलची उत्पादकता मिळते. यावर्षी मात्र मॉन्सूनने दगा दिल्याने 15 जुलैनंतरच पेरणी झाली. त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर हेक्‍टरी सरासरी केवळ दहा क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.


सण, उत्सव कसे साजरे होणार?

दिवाळी सण पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याकरिता लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी करीत तो व्यापाऱ्याला विकण्यावर भर दिला आहे. अनेक गावांमध्ये खरेदी सुरू झाली असून, शेतकऱ्यांची गरज ओळखत व्यापारी कापसात ओल असल्याचा निष्कर्ष काढत केवळ पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत.

पुरेसा पाऊस आणि उशिराच्या पेरणीमुळे कापसाची वाढ खुंटली आणि त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. हेक्‍टरी तब्बल पाच क्विंटलने घटलेली उत्पादकता आणि सोबतच दरातील घसरण शेतकऱ्यांना मारक ठरली आहे.

- भाऊसाहेब शेळके, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com