समुपदेशनाने जुन्या संसाराची नवी सुरवात

Court-Family
Court-Family

लातूर - त्या दोघांनीही घटस्फोटाची मानसिक तयारी केली. त्यासाठी दोघेही न्यायालयात पोचले. घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेचा क्षण अगदी जवळ आला; पण न्यायाधीशांनी आणि वकिलांनी दोघांनाही संवादाची आणखी एक संधी दिली. दोघांचेही तासभर समुपदेशन केले. घटस्फोट घेणे सोपे असते; मात्र त्यानंतर एकटे जगणे किती अवघड असते, याची जाणीव करून दिली. या संवादानंतर ते दोघेही हसऱ्या चेहऱ्याने बाहेर आले. घटस्फोटाचा विचार बाजूला सारून दोघांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला अन्‌ जुन्या संसाराला नव्याने सुरवात झाली.

जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात दाखलपूर्व प्रकरणांसाठी कौटुंबिक वाद निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याबाबत ‘कौटुंबिक वाद मिटणार संवादातून’ असे वृत्त सकाळच्या २ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याच केंद्रात पहिले दाखलपूर्व प्रकरण आले ते घटस्फोटाचे. गेल्या काही महिन्यांपासून सुभाष आणि सविता (नावे बदललेली आहेत) यांच्यात भांडणे सुरू होती. कौटुंबिक कारणामुळे त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते न्यायालयात पोचले. येथे आल्यानंतर त्यांना कौटुंबिक वाद निवारण केंद्राची माहिती वकिलांमार्फत कळली.  

घटस्फोट घेण्याआधी सुभाष यांनी कौटुंबिक वाद निवारण केंद्राला भेट दिली. वाद का होतात, हे त्यांनी समुपदेशकांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला बोलावण्यात आले. त्यांच्याशीही समुपदेशकांनी संवाद साधला. या संवादामुळे दोघांमधील वाद क्षुल्लक कारणावरून वाढले असल्याचे कारण पुढे आले. वादामागे क्षुल्लक कारण असल्याचे दोघांनाही पटले. त्यामुळे दोघांनीही घटस्फोट न घेता पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. तशी हमीही दिली. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश एस. डी. कंकणवाडी यांनी दोघांचाही सत्कार केला. यावेळी ॲड. सुरेश सलगरे, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. संगीता तादलापुरे, ॲड. गायत्री नल्ले, ॲड. राउफ शेख, अशोक जौंदळे, गणेश भोसले, कैलास गरुडकर, गजानन पांचाळ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com