ही संस्था यंदा लावणार ५१ जोडप्यांचा शुभविवाह

File photo
File photo

नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील ५१ जोडप्यांच्या रेशीमगाठी एप्रिल महिन्यामध्ये बांधून देणार आहेत. याशिवाय छत्र हरपलेल्या मुलींचे कन्यादान स्वीकारून त्यांच्या दारासमोर थाटामाटात लग्नही लावून दिले जाणार आहेत.

साईप्रसाद हा बिगर नोंदणीकृत दोन हजार ६०० लोकांचा समूह आहे. सेवा या शब्दावर अढळ श्रद्धा असणाऱ्या समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींचा यात समावेश आहे. हलाखीच्या परिस्थितीतील असणाऱ्या गरजवंतांना सेवा पुरवण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समुह असून पदनाम व कोष यांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला नाही. शिवाय सेवाही वस्तू स्वरूपातच दिली जाते. केवळ नांदेडच नाही तर पुणे, औरंगाबाद, मुंबई अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह भारतातील व अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आदी ठिकाणी राणाऱ्या भारतीय लोकही ‘साईप्रसाद’चे सदस्य असून त्यांच्याकडूनही या दैवी स्वरूपाच्या कार्यासाठी मदत केली जाते, हे या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे.

सोहळ्याचे वैशिष्ट्य
ग्रामीण भागातील कुटुंबे, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय आपल्या मुला-मुलींचे विवाह कर्ज काढून लावून देतात. मात्र, पुढे हे कर्ज फेडण्यासाठी असंख्य संकटांना कुटुंबप्रमुखाला सामोरे जावे लागते. त्यातून मग आत्महत्येसारख्या घटना घडतात. त्यामुळे कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला समारे जावू लागू नये, म्हणून साईप्रसाद अशा कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह अगदी मोफत पारंपरिक पद्धतीने लावून देतात. वधू-वरांकडील वऱ्हाडींसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात येते. वधू-वरांना एक-एक संपर्क प्रमुख दिला जातो. सकाळ नाश्‍ता, चहा, शुद्ध थंड पाणी, वऱ्हाडांसाठी भोजन, सनई चौघड्यांच्या सुरामध्ये वधू-वरांना चांदीच्या ताटात शाही भोजन असा हा भव्यदिव्य आणि नेत्रदिपक सोहळा साईप्रसादच्या निःस्वार्थ सेवातून होतो. गत पाचवर्षांत या सोहळ्यातून २६३ जोडप्यांचे विवाह लावून दिले असून त्यांचा संसारही आनंदता सुरु आहे.

पर्यावरणाचेही होते संरक्षण
या सोहळ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी कुणीही अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नसतात. कुणाचाही सत्कार होत नाही. अन्नधान्याची नासाडी होऊ नये म्हणून तांदूळ व ज्वारी एवजी फुलांच्या पाकळ्यांचा अक्षदा म्हणून वापर केला जातो. प्रदूषण होऊ नये यासाठी फटाक्यांचा वापर अजिबात होत नाही. आजपर्यंत साईप्रसाद जेवणामध्ये, पिण्याच्या पाण्यासाठी व लग्न कार्यातील वस्तुंसाठी प्लास्टीक ग्लास, वाटी, पात्र यांचा वापर टाळला जातो. पर्यावरण संरक्षण हाच मुख्य उद्देश यामागे असून, समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न ‘साईप्रसाद’च्या नाथांकडून होतो आहे.

असे आहेत अखंडित वर्षभरातील सेवाकार्य
०- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अनाथ, अंध-अपंगांचे मोफत सामुदायिक विवाह सोहळा.
०- ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून गरीब कुटुंबासह शहीद जवानांच्या मुलांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्यांचे वाटप
०- आपदग्रस्तांना सातत्याने संसारोपयोगी साहित्यांसह आर्थिक मदत
०- पाच वर्षांपासून अखंडित शासकीय रुग्णालयात मोफत शुद्ध पेयजलचे वाटप
०- शासकीय रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दररोज सकाळ व संध्याकाळी मोफत जेवण 
०- महिला बालगृहातील अनाथ ४५ मुलींच्या शिक्षण व आरोग्याची काळजी
०- सैन्यातील सैनिक व त्यांच्या परिवारासमवेत दिवाळी. (सन्मानपत्रासह परिवारातील सर्वांना नवीन कपडे व फराळाचे वाटप)
०- शहीद जवानांच्या कुटुंबियांसह कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी आर्थिक मदत

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com