बीड : न्यायालयाचा दणका; भाजप आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

- भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पतीवर फसवणूकीचा गुन्हा नोंदवून चौकशी करा
- केज न्यायालयाचे आदेश
- लोकनेते गोपीनाथराव मुंडे सुतगिरणीतील प्रकरण

 

केज : येथील भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीसह इतर गुन्हे नोंद करुन चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश येथील न्यायालयाने बुधवारी (ता. ११) दिले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूकीसाठी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याची फिर्याद गणपती कांबळे यांनी न्यायालयात केली होती.

भाजप आमदार संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहूरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे.

Image may contain: 1 person, close-up

सदर गैरव्यवहारात आमदार श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला.

Image may contain: 1 person, smiling, close-up

सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ आश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथ पत्र जोडून ॲड. संतोष मुंडे यांच्या मार्फत तक्रार दिली होती. यावरुन प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती थोरात यांनी आमदार संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court orders case file against BJP MLA sangeeta Thombre