उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ नवीन कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू

तानाजी जाधवर
Wednesday, 28 October 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२८) ७७ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एका बाधिताचा मृत्यु झाला. मात्र जिल्ह्याच्या बाहेरील मृत्यु झालेल्या सात जणांची जिल्ह्याच्या यादीत पोर्टलवर नोंद झाल्याने मृत्युचा दर वाढल्याचे दिसून येत आहे. साडेतीन टक्के मृत्युदर वाढल्याने चिंता कायम आहे, तर दिवसभरामध्ये ११४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १३ हजार १६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पाहिल्यास ९१.०४ टक्के इतके आहे.

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

बुधवारी आढळलेल्या ७७ रुग्णांपैकी ३८ जण आरटीपीसीआरद्वारे, तर ३३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सहा जणांना इतर जिल्ह्यामध्ये लागण झाल्याचे दिसुन येत आहे. १३१ संशयिताचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ३८ जणांना त्याची लागण झाली आहे, तर ५२६ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यातील ३३ जणांना लागण झाली आहे. उस्मानाबाद १४, परंडा १६, वाशी १२, कळंब १२, भूम सात, लोहारा चार, तुळजापूर आठ, उमरगा चार अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे. परंडा तालुक्यातील चिंचपुर येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. नोंद झालेल्या आठ मृत्यूंपैकी सात मृत्यु हे मागील काही दिवसांमध्ये जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेर झाले असुन कोरोनाच्या पोर्टलवर त्याची अद्ययावत नोंद करण्यात आली आहे. ही नोंद बुधवारी घेण्यात आली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 77 New Cases Registered In Osmanabad District