सराफ जेवायला जाताच कारागिराकडून दुकान साफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Jewelry

सराफ जेवायला जाताच कारागिराकडून दुकान साफ

लातूर - सराफा व्यापारी नेहमीप्रमाणे दुपारी घरी जेवण्यासाठी गेल्याची संधी साधून दुकानातील कारागिराने दुकानच साफ केले. काही मिनिटांत दुकानातील पंधरा लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन कारागिराने पोबारा केला. व्यापारी पाऊणतासाने भोजन करून परत दुकानात आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. तोपर्यंत कारागीर दागिन्यासह बेपत्ता झाला होता. मुरूड (ता. लातूर) येथील सराफा गल्लीत शुक्रवारी (ता. बारा) ही घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दागिन्यासह पोबारा केलेल्या कारागिराचा कसून शोध सुरू केला आहे.

मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले, की येथील सराफा व्यापारी सोमनाथ मुरलीधर दीक्षित (वय ५०, रा. शिवाजीनगर, मुरूड) यांचे सराफा गल्लीत महालक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्याचांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आठ ते नऊ महिन्यांपासून सुग्रीव ऊर्फ बाळू कुमार बावकर (रा. दत्तनगर, मुरूड) हा कारागीर म्हणून कामाला होता. सुग्रीवने यापू्र्वी अनेक सराफा व्यापाऱ्याकडे काम केले आहे. सोन्यापासून दागिने तयार करणे व दागिने दुरुस्ती करण्याचे काम तो करत होता. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता श्री. दीक्षित हे नेहमीप्रमाणे घरी जेवण्यासाठी गेले. या काळात सुग्रीवने दुकानातील ३०७ ग्रॅम वजनाचे पंधरा लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला.

चार नेकलेस, चार शार्ट गंठन, आठ सरपाळ्या जोड, दोन गंठण, डब्बल डेकर झुब्याचे बारा जोड, बारा जोड झुबे आदी दागिन्यांचा त्यात समावेश आहे. काही मिनिटांत कारागिराने ही संधी साधली. श्री. दीक्षित हे पाऊणतासानंतर परत दुकानात आल्यानंतर त्यांना शोकेसमधील ट्रेमध्ये लावलेले दागिने दिसून आले नाहीत. दागिन्यासोबत कारागीरही गायब होता. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून कारागीर सुग्रीव बावकर याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुग्रीवचा शोध सुरू केला असून, त्याने चोरीसाठी वापरलेल्या कारचा पोलिसांना सुगावा लागल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांनी शनिवारी रात्री दुकानाला भेट दिली. या घटनेमुळे येथील सराफा व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक अतुल पतंगे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :crimethiefjewellery shop