आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा, जिल्हाबंदीचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

सध्या सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून एकत्र येण्यास बंदी आहे. शिवाय जिल्हाबंदी लागू आहे. या दोन्ही आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी (जि. बीड) - आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांची खेड (ता. कर्जत) येथे भेट घेत ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर जिल्हाबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कलमांन्वये आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परजिल्ह्यात ऊसतोडीसाठी गेलेल्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना लॉकडाऊनमुळे घराकडे परतण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा समूह भिगवण (जि. पुणे) भागातून परतत होता. यावेळी भिगवण-खेड (ता. कर्जत) हद्दीत त्यांना भिगवण पोलिसांनी एक मार्चला रात्री अमानुष मारहाण केली. याबाबतची माहिती ऊसतोड मजुरांनी आमदार धस यांना रात्री एकच्या सुमारास दिली. त्यानंतर लगेचच श्री. धस हे खेडकडे रवाना झाले. तेथे ऊसतोड मजुरांना धीर देत त्यांनी या अमानुष मारहाणीचा निषेध करीत ठिय्या आंदोलन केले. 

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

दरम्यान, सध्या कोरोनामुळे संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार पाचपेक्षा अधिक लोकांना तेही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून एकत्र येण्यास बंदी आहे. शिवाय जिल्हाबंदी लागू आहे. या दोन्ही आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार धस यांच्याविरुद्ध गुरुवारी (ता. दोन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक प्रशांत अर्जुन क्षीरसागर यांनी दिली आहे. 

 

घरी परतणाऱ्या मतदारसंघातील ऊसतोड मजुरांना अमानुष मारहाण झाल्याने आपण तातडीने त्या ठिकाणी गेलो. मी माझे काम केले आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी पूर्ण केली. गुन्हा दाखल झाल्याबाबत माझे काहीही म्हणणे किंवा आक्षेप नाही. 
- सुरेश धस, आमदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against MLA Suresh Dhas