तत्कालीन रोखपालासह एजंटावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

लातूर - येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जानेवारी ते जून 2014 या कालावधीत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा पॉलिसी हप्ता न भरता तो विमा प्रतिनिधीकडे देऊन अपहार केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन रोखपालासह विमा प्रतिनिधीच्या विरोधात रविवारी (ता. 27) येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साडेतीन वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील एलआयसी हप्ताप्रकरण गेली तीन वर्षे नुसतेच चर्चेत राहिले. या कालावधीत दोन पोलिस अधीक्षक बदलून गेले, गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी अपर पोलिस अधीक्षक लता फड यांची चौकशी समितीही नियुक्त केली होती. या चौकशीत हा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिस दलाच्या आस्थापनेवर असलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांचे जानेवारी ते जून 2014 या कालावधीत एलआयसी पॉलिसीचे हप्ते पगारीतून कपात केले; परंतु त्यांच्या एलआयसी क्रमांकावर जमा झाले नाहीत. तसेच कार्यालयीन कामात नियमावली अनुसरण्यात आली नाही. तसेच पॉलिसी संदर्भातही पोलिस अधीक्षक कार्यालयात मूळ रेकॉर्डच ठेवण्यात आले नसल्याचे या चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

या प्रकरणात तत्कालीन रोखपाल ए. डी. बैनवाड यांनी कोणतीही कार्यालयीन प्रणाली न अनुसरता पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणारा पॉलिसी हप्ता एलआयसी कार्यालयात जाऊन यादीप्रमाणे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी क्रमांकावर जमा करणे आवश्‍यक होते; पण तसे न करता एलआयसी कपातीच्या याद्या विमाप्रतिनिधी पी. व्ही. गिते यांच्याकडे सोपविल्या. त्यांनी संगनमताने एलआयसी पॉलिसी हप्त्याची कपात याद्यांमध्ये फेरफार करून अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी अधिकारी व अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या फिर्यादीवरून बैनवाड व गिते यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अंदाजे साडेनऊ ते दहा लाखांचा अपहार आहे; पण ही रक्कम वाढूही शकते. याप्रकरणी लवकरच कारवाई होईल. 
-डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक. 

Web Title: With crime on the agent