चाकूच्या धाकावर तरुणीचे अपहरण करून केले लग्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

औरंगाबाद - एकतर्फी प्रेमातून चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती विवाह केल्याची खळबळजनक घटना सात एप्रिलला घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, त्यानंतर तरुण पसार झाला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार : वीस वर्षीय तरुणी शहरात राहते. तिच्याशी शेख रियाज शेख साबेर याची ओळख आहे. या ओळखीचा फायदा घेऊन तो तिला लग्नाचा तगादा लावीत होता; परंतु तरुणीने त्याचा प्रस्ताव साफ धुडकावला होता. त्यानंतर तिला वारंवार लग्नासंबंधी विचारणा करून तो धमकावत होता. त्याने तिचा विनयभंगही केला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार सुरू असल्याने ही बाब तरुणीने कुटुंबीयांना सांगितली. तरुणीच्या कुटुंबीयांनी शेख रियाजच्या घरी माहिती दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातूनही विरोध झाला; पण त्याने तरुणीचा माग सोडला नाही. सात एप्रिलला सायंकाळी त्याने तरुणीला गाठले. तिला चाकूचा धाक दाखवून एका रिक्षात बसविले व त्यानंतर तिच्याशी विवाह केला. तिच्या आई-वडिलांना धमकावत तिला घरी नांदण्यासाठी घेऊन गेला. या प्रकारानंतर तरुणीने व तिच्या नातेवाइकांनी क्रांती चौक ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, या गुन्ह्याची नोंद झाली. गुन्हा नोंद होताच तरुण पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ करीत आहेत.

Web Title: crime in aurangabad