
Crime : भिसीमध्ये पैसे भरण्यास भाग पाडत फसवणूक; फिर्यादीने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे
छत्रपती संभाजीनगरः भिसीमध्ये नंबर टाकल्यास आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखवत दोघांनी एका तरुण व्यवसायिकाला तब्बल सात लाख ३४ हजार रुपयांचा चुना लावला. पैसे परत मागितल्यानंतर दोघा आरोपींनी दिलेला धनादेशही बॅंकेत वटला नाही.
हा प्रकार २८ ऑक्टोंबर २०२१ पासून आजतायागत सिडको परिसरात घडत होता. याप्रकरणी फसवणूक झालेल्या पोलिसांत धाव घेतली मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर तरुणाने पोलिस आयुक्तालयात धाव घेतली, त्यानंतरही तोडगा न निघाल्याने तरुणाने न्यायलयाचे दरवाजे ठोठावले.
अखेर न्यायालयाच्या आदेशाने सिडको पोलिसांना फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. राहूल हिलरालाल जुक्कलवाड आणि संदीप हिरालाल जुक्कलवाड (रा. दोघेही गोकूळनगर, जाधववाडी) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सागर भागत भारस्कर (२५, रा.जाधववाडी) या तरुण व्यवसायिकाने फिर्याद दिली. त्यानुसार वरील दोघेही आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी दोघे आरोपी सागरला जाधववाडी मोंढा येथे भेटले, दरम्यान दोघांनी आम्ही नवीन भिसी सुरु करत असून त्यात नंबर टाकण्याचे सांगितले.
त्यावर फिर्यादी सागरने नकार दिला असता, दोघा आरोपींनी सागरला त्याच्या ओळखीची चार नावे सांगून तेही भिसीत असल्याचे सांगत नंबर टाकण्यास तयार केले. सागरने ठरलेल्या तारखेत रोख स्वरुपात भिसीपोटी सात लाख ३५ हजार रुपये दोघांना दिलेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सागरला दिलेला धनादेशही वटला नाही
भिसी सुरु असताना सागरचा नंबर उठला, मात्र दोघांनी सागरला भिसीची रक्कम न देता घरी आर्थिक अडचण असून १० ते १५ दिवसांत देतो म्हणत टाळाटाळ करत वेळ मारुन नेली. बरेच दिवस होऊनही पैसे मिळत नसल्याने सागरने दोघांच्या भेटीदरम्यान राहूल जक्कलवाड याने संस्थेचे नाव टाकून १०० रुपयांच्या बंधपत्रावर लिहून दिले.
मात्र मला खोटे बोलू नका, मी पोलिसांत जाईन म्हणत सागरने पैसे मागितले असता, आरोपींनी काही टक्केवारीनुसार पैसे कपात करुन सात लाख ३५ हजारांचा धनादेश दिला. सदर धनादेश सागरने बॅंकेत टाकला असता, तो बाऊन्स झाला. त्यानंतर दोघांनी मोबाईल बंद करुन ठेवले.
दरम्यान सागरने अनेकवेळा पैशांची मागणी करुनही त्याला पैसे न मिळाल्याने सागरने पोलिसांत धाव घेतली मात्र त्याला पोलिस ठाण्यासह पोलिस आयुक्तालयातही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर फिर्यादीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने चौकशीअंती पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश दिले. याप्रकरणी दोघांविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अशोक अवचार हे करत आहेत.