मुलीचा देवीसोबत विवाह लावण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

अंधश्रद्धेतून मुळज (ता. उमरगा) येथील कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा प्रयत्न केला. बालविवाह प्रतिबंध समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबाचे समुपदेशन करीत या अघोरी प्रकाराला आळा घालण्यात यश मिळविले.

उमरगा - अंधश्रद्धेतून मुळज (ता. उमरगा) येथील कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याचा प्रयत्न केला. बालविवाह प्रतिबंध समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबाचे समुपदेशन करीत या अघोरी प्रकाराला आळा घालण्यात यश मिळविले.

मुळज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कुटुंबाने २१ वर्षीय मुलीच्या कानातून होणारा रक्तस्त्राव थांबल्याने नवसानुसार मुलीचा विवाह देवीसोबतच लावण्याचे ठरविले होते. त्यानुसार हे कुटुंबीय मंगळवारी (ता. दोन) पहाटेच्या मुहूर्तावर तालुक्‍यातील भगतवाडी देवीच्या ठिकाणी जाणार होते. तेथे मुलीचा विवाह लावणार होते.

याबाबतची कुणकुण बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना काल सायंकाळी लागली. त्यांनी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमण यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी सातच्या सुमारास उमरग्यात बैठक झाली. श्री. बिद्री यांच्यासह प्रा. किरण सगर, ॲड. हिराजी पांढरे, पोलिस ठाण्याच्या समुपदेशक राऊ भोसले, महिला सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी दुबे, संजीव विभुते उपस्थित होत्या. बैठकीनंतर रात्री नऊला या सर्वांनी मुळज गाठले. संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली. समुपदेशन, शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा व बालविवाहचे दुष्परिणाम पटवून दिले. त्यानंतर असे करणार नाही, असे कुटुंबीयांनी मान्य केले. भगतवाडी येथे बकऱ्याचा बळी देण्याचा बेत मात्र या कुटुंबीयांनी पूर्ण केला.

जोगतीण-मुरळी म्हणून...
संबंधित मुलीची आजी, वडील, आई, काका हे नातेवाइकांच्या मदतीने संबंधित मुलीचा भगतवाडीच्या देवीसोबत विवाह लावून जोगतीण-मुरळी म्हणून तिला सोडून देणार होते. त्याचे कारण सांगितले गेले ते असे - मुलीच्या कानातून अधूनमधून रक्तस्त्राव होत होता. तो उपचारानंतरही थांबत नव्हता. त्यामुळे भगतवाडीच्या देवीसोबत तिचे लग्न देवीशी लावू, असा नवस तिच्या आजीने केला होता. दरम्यानच्या काळात नातीच्या कानातून होणारा रक्तस्त्राव बंद झाला. नवसपूर्तीसाठी अघोरी पद्धतीनुसार विधी करून हे लग्न लावून देण्याची तयारी संबंधित कुटुंबीयांनी केली होती.

बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच पदाधिकाऱ्यांना पोलिसांसह मुळजमध्ये पाठविले. त्यांना अनिष्ट प्रथा रोखण्यात यश आले. समाजात अंधश्रद्धतूेन असे प्रकार घडत असतील तर तत्काळ संपर्क साधावा.
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी, उमरगा

Web Title: Crime Girl Marriage with God Superstition