शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्यास तीन वर्षांची सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पैठण परिसरातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ही शिक्षा सुनावली. केशव मोहन गोरडे असे आरोपीचे नाव असून, तो बालानगर (ता. पैठण) येथील रहिवासी आहे. 

औरंगाबाद : पैठण परिसरातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ही शिक्षा सुनावली. केशव मोहन गोरडे असे आरोपीचे नाव असून, तो बालानगर (ता. पैठण) येथील रहिवासी आहे. 

पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एक ऑगस्ट 2014 रोजी ती घरी जात असताना आरोपीने तिला सोबत येण्यास सांगितले. मुलीने आरोपीच्या हाताला झटका देऊन पळ काढला; परंतु पळताना तिचा ड्रेस फाटला व पुन्हा आरोपीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने आरोपीच्या तोंडात चापट मारली. रडत रडत घरी येऊन तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यावेळी गावातील जाकेरभाई व इतर गावकऱ्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर आरोपीविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अरुण ठोंबरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलीसह जाकेरभाई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. 

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास महिन्याच्या कारावास, तर दुसऱ्या कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Crime Girl three years jailed a man