गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम करणाऱ्या चौघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

वसमत तालुक्यातील कुरुंदा भागातील टोकाई गडाच्या परिसरामध्ये कुरुंदा पोलिसांचे पथक शुक्रवारी गस्तीवर होते. यावेळी टोकाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर चौघेजण बसले असल्याचे कुरुंदा पोलिसांना दिसून आले.

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा भागातील टोकाईगड जवळ गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम करणार्‍या चौघांवर कुरुंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२४) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली असून त्या ठिकाणावरून हळद-कुंकू तांदुळाच्या पुड्या व एक  लिंबू जप्त केले आहे

वसमत तालुक्यातील कुरुंदा भागातील टोकाई गडाच्या परिसरामध्ये कुरुंदा पोलिसांचे पथक शुक्रवारी गस्तीवर होते. यावेळी टोकाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर चौघेजण बसले असल्याचे कुरुंदा पोलिसांना दिसून आले. सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक श्री. नेटके, जमादार आनंदा वाळके, शंकर इंगोले यांचे पथक तेथे गेले.  पोलिसांना पाहताच तिघे जण पळून गेले तर एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याची आधीक चौकशी केली असता तो नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथील असून गंगाराम केरबा वाठोरे असे त्याचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित तिघांमध्ये कळमनुरी तालुक्यातील रामवाडी व शिरड शहापूर येथील दोघांचा समावेश असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान या प्रकरणात कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळावरून हळद, कुंकू, तांदळाच्या पुड्या व एक लिंबू जप्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला असून जादूटोणा करून गुप्तधनाच्या उद्देशानेच हा खड्डा खोदल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वसमत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने पुढील तपास करीत आहेत. तसेच कुरुंदा पोलिसांचे एक पथक उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.

Web Title: crime incident in Hingoli