पैशासाठी जन्मदात्याला मुलाने पेटविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुरूम - पैशाच्या मागणीसाठी धनराज मलकप्पा ढाले (वय 40) याने जन्मदात्यावर रॉकेल ओतून पेटवून ठार मारले. ही घटना मुरूम येथे सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुरूम पोलिसांनी ढाले याला अटक केली आहे. शेती दुसऱ्याला कसण्यासाठी देऊन त्याचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्याने रविवारीही (ता.2) आई-वडिलांना बेदम मारहाण केली होती.

ख्याडे गल्लीत राहणारे मलकप्पा तोटप्पा ढाले (वय 80) यांच्याकडे त्यांचा मुलगा धनराजने शेतीचे पैसे देण्यासाठी काही दिवसांपासून तगादा लावला होता. याच कारणावरून तो आई-वडिलांसोबत भांडण करीत सतत जाळून मारण्याची धमकी देत होता. काल सकाळीही त्याने कडाक्‍याचे भांडण करीत आई शांताबाई ढाले व वडील मलकप्पा ढाले यांना मारहाण केली होती. यामुळे शांताबाई पाहुण्याकडे झोपायला गेल्या होत्या; तर मलकप्पा घरासमोरील अंगणात झोपले होते.

मध्यरात्री धनराजने झोपेत असलेल्या वडिलांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; मात्र तेथील कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याने उडालेल्या आगडोंबात मलकप्पा यांचा होरपळून मृत्यू झाला.
या आगीत शेजारी राहणारे लायक मुल्ला यांचा तीस हजार रुपये किमतीचा कडबा जळून खाक झाला. काही युवकांनी पोलिसांना माहिती दिली, तसेच अग्निशामक दलाला पाचारण केले. शांताबाई ढाले यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलिस ठाण्यात धनराज ढाले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: crime in murum