2 Aug 2019 : औरंगाबादमध्ये कुठे झाली, चोरी कुणाला झाली मारहाण?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - शहरात शुक्रवारी (ता. दोन) विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या काही गुन्ह्यांच्या बातम्या.

गुटखा विक्रेत्यावर छापा 
अन्न-औषधी प्रशासन व गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून सहा पोती गुटखा व दोन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई जिन्सी पोलिस हद्दीतील संजयनगर येथे एक ऑगस्टला करण्यात आली. याआधी दोनपैकी एका संशयिताला अटक केली होती. पोलिस व अन्न-औषधी प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार संजयनगर येथे सापळा रचला. त्यानंतर प्रभू मकरिये (रा. संजयनगर) व जितेश कुरलिये (रा. न्यू हनुमाननगर) यांना दुचाकीवरून गुटख्याचे पोते नेताना पकडले. गोण्यांत सहाशे पाकिटे आढळली. अन्नसुरक्षा निरीक्षक प्रशांत अजिंठेकर यांनी पंचनामा करून दोन्ही दुचाकी व गुटखा असा दोन लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालकांत मारहाण 
रिक्षात प्रवासी बसविण्यावरून चालकांत बाबा पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (ता. एक) सकाळी सव्वासातच्या सुमारास मारहाण झाली. शैलेश सुधाकर अर्नाजलम (रा. शांतीपुरा, छावणी) बाबा पेट्रोलपंपाजवळ रिक्षात प्रवासी बसवत होते. त्यावेळी प्रवासी बसविण्यावरून दुसऱ्या चालकासोबत त्यांचा वाद झाला. यातून मारहाण झाली व त्यात शैलेश यांचा दात पडला. याबाबत शैलेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक पी. एम. नवघरे करीत आहेत. 
 
तरुणाला फायटरने मारहाण 
खुन्नसीच्या भावनेने बघितल्याचा आरोप करून दोघांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास रमानगर भागात घडली. दीपक गौतम शिनगारे (रा. रमानगर) व एस. के. सागर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दीपक हा घरासमोर उभा होता. त्यावेळी सागर व एका अल्पवयीनाने त्याला "तू आमच्याकडे खुन्नशीने का पाहतो,' असे म्हणत फायटरने मारहाण केली. यात दीपकच्या कानाला, डोक्‍याला व डाव्या गालाला जखम झाली. दीपकच्या तक्रारीनुसार याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास जमादार जाधव करीत आहेत. 

चोरट्याने लांबविले घरातून सिलिंडर! 
व्यावसायिकाच्या घरातून चोराने गॅस सिलिंडर व चार हजार रुपये लंपास केले. ही घटना सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय नरसू पोपळे (रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली. ते झोपलेले असताना चोराने आत घुसून सिलिंडर व रोख रक्कम लंपास केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोपळे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

लोखंडी पाइपचोर अटकेत 
चिकलठाणा एमआयडीसीत युनायटेड स्पिरीट लिमिटेड कंपनीतून लोखंडी पाइप चोरी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संतोष ज्ञानदेव मांदळे (रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. ते कंपनीचे सुरक्षारक्षक आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास मांदळे कंपनीत होते. त्यावेळी संशयित गणेश मिलिंद निकाळजे (रा. सिंधीबन, मसनतपूर) हा कंपाउंडच्या बोगद्यातून लोखंडी पाइप चोरी करीत होता. ही बाब लक्षात येताच त्याला मांदळे यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मांदळे यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
मंगल कार्यालयातून दागिने लांबविले 
नातेवाइकांच्या मुलीच्या लग्नासाठी गेलेल्या महिलेची पर्स व दागिने लंपास झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास सिडकोतील साखरे मंगल कार्यालयात घडली. आशाबाई मनोहर शेजवळ (रा. एन-दोन, ठाकरेनगर, सिडको) यांनी तक्रार दिली. त्या साखरे मंगल कार्यालयात नातेवाइकाच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी गेल्या. त्यावेळी चोराने चार ग्रॅम सोन्याचा दागिना असलेली पर्स लांबवली. ही बाब उघडकीस येताच शेजवळ यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार धनेधर करीत आहेत. 
  
दोन दुचाकी चोरीला 
औरंगाबाद शहरातून दोन दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिडको व क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सुनील मच्छिंद्र राऊत (रा. बजरंग चौक, सिडको) यांची दुचाकी 28 जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास चोराने एचपी गॅस कार्यालयाजवळून चोरली. चंद्रकांत नानासाहेब पवार (रा. नूतन कॉलनी, अजबनगर) यांची दुचाकी चोराने रात्री नूतन कॉलनीतील निरामय हॉस्पिटलच्या पार्किंगमधून हॅंडल लॉक तोडून लंपास केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com