परंडा येथे पेट्रोलपंपावर दरोडा प्रकरणी 5 अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

परंडा येथील पेट्रोलपंप लुटल्याच्या बनावाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. 

उस्मानाबाद ः परंडा येथील पेट्रोलपंप लुटल्याच्या बनावाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

परंडा येथील अजिंक्‍यराजे पेट्रोलियम (डोमगाव, ता. परंडा) या पंपावर सोमवारी (ता. नऊ) पहाटे अडीचच्या सुमारास तिघांनी पंपावरील कामगार श्रीराम महादेव खरात, प्रशांत नरसाळे व रमेश खताळ (सुरक्षारक्षक) यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून कोयत्याने मारहाण करून पंपावरील एक लाख 92 हजार 570 रुपये, तिन्ही कामगारांचे तीन मोबाईल असा एकूण एक लाख 97 हजार 670 रुपयाचा माल लंपास केला होता. पेट्रोलपंपावरील कामगार श्रीराम महादेव खरात (रा. डोंमगाव, ता. परंडा) याने तशी तक्रार परंडा पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

परंडा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्काळ घटनास्थळी चौकशी केली. तपासादरम्यान पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक अजित हवालदार गायकवाड याच्यासह त्याचा सहकारी पंपावरील कामगार श्रीराम महादेव खरात यांच्या वर्तनात, जबाबात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान अजित हवालदार गायकवाड, श्रीराम महादेव खरात, पंपावरील कामगार कामगार राहुल प्रभाकर दाभाडे, अजित भाऊराव धेंडे, अनिल देविदास कांबळे या सर्वांनी मिळून पंप लुटीचा बनाव रचल्याचे उघड झाले. या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News