तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा घेत रविवारी (ता. २०) दिवसभर घाटीत ठिय्या दिला. रात्री उशिरा कारागृह अधिकाऱ्यासह, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र  त्यात कोणाचेही नाव नोंदविलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश रोहिदास राठोड (वय ३६) असे मृताचे नाव आहे. तो (मूळ भारंबा तांडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी आहे. औरंगाबादेत तो कामानिमित्त वास्तव्यास होता. गवंडीकाम करून तो उदरनिर्वाह करीत होता. एका किरकोळ प्रकरणात मयूरपार्क येथील एका महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. 

या प्रकरणात जामीन घेण्यास असमर्थ असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर १७ जानेवारीला योगेशला हर्सूल कारागृहात नेण्यात आले. या प्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी आरोप केला, की योगेशला कारागृह प्रशासनाकडून बेदम मारहाण झाली, नंतर तो अत्यवस्थ झाला. यानंतर त्याला कारागृह प्रशासनाने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. योगेशला बेदम मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. खुनाचा गुन्हा नोंद करण्याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनावर राजपालसिंग राठोड, डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ता राठोड, विष्णू आडे, अनिल चव्हाण, मनोज राठोड, योगीराज राठोड, दिगंबर राठोड आदींच्या सह्या आहेत. याबाबत कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी  सांगितले की, कारागृहातील मृत्यू प्रकरणाची कारागृह व सुधारसेवा महासंचालकांनी गांर्भीयाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. सर्व बाजुने सांगोपांग चौकशी होईल. कारागृहाचा क्‍लेम, वैद्यकीय अडचणी, तसेच संशयिताला फिटस येत होत्या का, याबाबत तसेच मारहाण, डोक्‍याची इजा व नातेवाईकांचा आरोप या सर्व मुद्यावर चौकशी होणार आहे. योगेशला कुठे ठेवले होते, कशाप्रकारे ठेवले, कोण आरोपी त्याच्यासोबत होते. स्टाफ कुठे होता. याचा अहवाल तयार करणार आहोत. दुर्लक्ष कुणाचे झाले का, ओमीशन अथवा कमीशन अशा बाबी दिसल्या तर नक्कीच संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होईल.

या आहेत मागण्या
- योगेशच्या मृत्यूप्रकरणी त्याला मारहाण करणाऱ्या कारागृहातील जबाबदार अधिकारी व पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा.
-कुटुंबाला पन्नास लाखांची मदत द्यावी. 
-पत्नीला सरकारी नोकरी द्यावी.
-संबंधित प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे.
-खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करावे.


बेदम मारहाणीचा आरोप
सतरा जानेवारीला सायंकाळी सात ते रात्री दीडपर्यंत योगेशला कारागृहात बेदम मारहाण झाली. नंतर तेथून त्याला रात्री घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १८ जानेवारला आम्ही घाटी रुग्णालयात गेलो. त्यावेळी तो कोमात असल्याचे कळाले. त्यानंतर तो मृत झाल्याचे घोषित केले गेले. पोलिसांकडून खून झाला असून योगेशला न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. कृष्णा राठोड यांनी केली आहे.
राजकीय नेत्यांनी घेतली नातेवाइकांची भेट
कारागृहात मृत्यू झालेल्या योगेश राठोड याच्या नातेवाइकांचे घाटी रुग्णालयात ठिय्या आंदोलन रात्रीपर्यंत सुरूच होते. मृताच्या नातेवाइकांची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, हर्षवर्धन जाधव, डॉ. कल्याण काळे आदींनी भेट घेत विचारपूस केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नातेवाइकांचे सांत्वन केले. पोलिसांच्या ताब्यात असताना इतक्‍या बेरहमीने तरुणाला मारणे हे आजपर्यंत घडले नाही. ही क्रूरता असून, नातेवाइकांच्या मागण्यांचे समर्थन करतो, अशी भावना श्री. भुजबळ यांनी व्यक्त केल्याचे मृताचे नातेवाइक राजपालसिंग राठोड यांनी सांगितले. 

मोठा फौजफाटा, उशिरा शवविच्छेदन
मृत्यूनंतर ठिय्या आणि आंदोलनामुळे योगेशची उत्तरीय तपासणी रखडली होती. सायंकाळी सातच्या सुमारास उत्तरीय तपासणी करण्यात आली. काही वेळात ही प्रक्रिया पार पडली; परंतु मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांचा रात्रीही कायम होता. यावेळी मोठा फौजफाटा घाटीत तैनात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com