सव्वाचार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गोदाममालकासह दहाजणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

उदगीर - शहरालगत मादलापूर शिवारात असलेल्या दोन गोदाम मालकांनी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या शेतीमालाची परस्पर विक्री करून, चार कोटी वीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गोदाम मालकांसह दहा जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

उदगीर - शहरालगत मादलापूर शिवारात असलेल्या दोन गोदाम मालकांनी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या शेतीमालाची परस्पर विक्री करून, चार कोटी वीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गोदाम मालकांसह दहा जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, की शहरालगत मादलापूर शिवारात राजकुमार वैजनाथ गुळंगे व त्याची पत्नी जयश्री राजकुमार गुळंगे हिच्या नावाने ओंकार वेअर हाऊस व स्वामी समर्थ वेअर हाऊसची गोदामे आहेत. या गोदामात दोघांनी सोयाबीन, हरभरा, मोहरी, तूरडाळ, तूर आदी बावीस हजार क्विंटल शेतीमालाची साठवणूक केली होती. हा शेतीमाल त्यांनी आयडीबीआय, एचडीएफसी, इंडलसन व ऍक्‍सिस बॅंकेकडे तारण ठेवून कर्ज उचलले आहे. नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (एनसीएमएल) ही कंपनीही वेअर हाऊसच्या व्यवसायात असून, बॅंकांना वेअर हाऊसमध्ये तारण ठेवलेल्या शेतीमालावर कर्जपुरवठा करण्यासोबत शेतीमालाची राखण, शेतीमालाची प्रत, त्याचा दर्जा व बाजारभावही काढून देण्याचे काम करते. याच कंपनीच्या देखरेखीखाली गुळंगे यांच्या दोन्ही वेअर हाऊसमधील शेतीमाल बॅंकांकडे तारण ठेवण्यात आला होता. त्यावरून गुळंगे यांनी कोट्यवधीचे कर्ज बॅंकांकडून उचलले आहे.

एनसीएमएल कंपनीने दोन्ही वेअर हाऊसमधील शेतीमालाची राखण करण्यासाठी दुय्यम व्यवस्थापक रवी अशोकराव शेट्टे याची नियुक्ती केली होती. गुळंगे दाम्पत्याने बॅंकांचे कर्ज न फेडता, रवी शेट्टे याच्यासोबत संगनमत करून दोन वेअर हाऊसमधील विविध शेतीमालाच्या सात हजार 230 पोत्यांची परस्पर उचल करून त्यांची विक्री केली. यातून गुळंगे यांनी बॅंकांची चार कोटी वीस लाख रुपयांनी फसवणूक केली. कंपनीच्या वतीने 26 नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या अंतर्गत लेखा परीक्षणातून ही बाब पुढे आली. त्यानंतर गुळंगे यांनी रक्कम भरण्यासाठी वेळ मागितला. वेळ देऊनही त्यांनी रक्कम भरली नाही. यामुळे कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक अंगद नारायण मंगनाळे यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांत गुरुवारी (ता. 16) तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी राजकुमार गुळंगे, जयश्री गुळंगे, राजेंद्र बारहाते, बळीराम मोरे, भीमराव डोणगापुरे, चंद्रकांत तोंडचिरे, संगमेश्वर धनुरे, उमाकांत स्वामी, सुरेश बिरादार व कंपनीचा दुय्यम व्यवस्थापक रवी शेट्टे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट तपास करत आहेत.

Web Title: crime by scam