फिर्याद देण्यास भाग पाडणारेच निघाले आरोपी

Court
Court

जालना - अहंकार  देऊळगाव (ता. जालना) येथे चाळीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांना तालुका पोलिसांनी गुरुवारी (ता. २२) अटक केली आहे. त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोन जण फरारी आहेत. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर संशयितांनी पीडितेवर दबाव टाकला. राजकीय द्वेषापोटी इतर चार व्यक्तींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करायला सांगून त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या उलटतपासणीत फिर्याद देण्यासाठी मदत करणारेच संशयित निघाले.

अहंकार देऊळगाव येथील सरपंच पती बाबासाहेब सोमधाने याच्या शेतात पीडित महिलेचा मुलगा सहा ते सात महिन्यांपासून सालगडी म्हणून काम करीत आहे. १८ नोव्हेंबरला पहाटे संशयितांनी महिलेच्या मुलाला एका खोलीत कोंडले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी येथील तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधत गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर संशयितांना अटक करा, अशी मागणी पीडित महिलेस फिर्याद देण्यासाठी मदत करणारे सातत्याने करू लागले. त्यातून पोलिसांचा संशय बळावला व मागणी करणाऱ्यांचीच उलट तपासणी केली. त्यावेळी या प्रकरणात गोवण्यासाठी इतरांची नावे दिल्याचे, पीडित महिलेस फिर्याद देण्यास मदत करणारेच संशयित आरोपी असल्याचे तपासात पुढे आले.

पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सरपंच पती बाबासाहेब सदाशिव सोमधाने (वय ४३), देविदास सदाशिव सोमधाने (५५), कृष्णा मच्छिंद्र सोमधाने (२८), परमेश्वर शंकर गंडाळ (४८), मच्छिंद्र नामदेव कबले (२३, सर्व रा. अहंकार देऊळगाव) या संशयितांना अटक केली आहे.
 या प्रकरणातील अर्जुन मच्छिंद्र सोमधाने, मनोहर मच्छिंद्र सोमधाने (दोघे अहंकार देऊळगाव) हे संशयित फरारी असून त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौघांना गोवण्याचा प्रयत्न
पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर संशयितांनी द्वेषापोटी इतर चार जणांना गोवण्याचा बनाव केला. त्यासाठी पीडित महिलेवर दबाव टाकून अन्य चौघांची नावे गोवली, त्यामुळे सुरवातील या चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला आणि फिर्याद देण्यासाठी मदत करणारे व सातत्याने पाठपुरावा करणारेच संशयित निघाल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com