अट्टल घरफोड्या सनी जाधवला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - दोन वर्षांसाठी तडीपार असलेला अट्टल घरफोड्या सनी जाधव आणि त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

औरंगाबाद - दोन वर्षांसाठी तडीपार असलेला अट्टल घरफोड्या सनी जाधव आणि त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

१३ एप्रिलला दुपारी विटखेडा येथील बेबीबाई यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याबाबत शनिवारी (ता. २८) गुन्हे शाखेला खबऱ्याकडून कळाले, की सनी जाधव घरफोडीतील सोने घेऊन बीड बायपास रस्त्याने सातारा येथे घेऊन जाणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बीड बायपास रस्त्यावरील एका हॉटेलजवळ सापळा रचून तडीपार सूर्यकांत ऊर्फ सनी गोपीनाथ जाधव (२२, रा. क्रांतीनगर, कोकणवाडी, औरंगाबाद) यास ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून एक सोन्याचे गंठण आणि कानातील झुंबे असे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले; तसेच इतर मुद्देमालाबद्दल चौकशी केली असता घरफोडीतील अन्य सोन्याचे दागिने जयदीप रमेश मेखे (सराफ) (२८, रा. अभिनय टॉकीजजवळ) यास विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून सराफा दुकानदाराकडे तपास केला असता त्याच्याकडे सात तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने सापडले. दोघांकडून गुन्ह्यातील ३ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. या वेळी सनी याने आनंद विहार हॅप्पी होम येथील फ्लॅटमधूनही चोरी केल्याचे सांगितले. त्याच्यावर आतापर्यंत २० गुन्हे दाखल असून सराफासह सनी यास सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे, उपायुक्‍त दीपाली धाटे-घाडगे, रामेश्‍वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे घनश्‍याम सोनवणे, सुभाष शेवाळे, संतोष हबड, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात आदींनी पार पाडली.

Web Title: criminal sunny jadhav arrested crime