सोयगाव तालुक्‍यात नजर अंदाज पैसेवारी सरासरी 75 टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

तालुक्‍यात खरिपाच्या पिकांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी 75 टक्के असल्याची घोषणा महसूल विभागाने मंगळवारी (ता. एक) केली. दरम्यान, नजर अंदाज पैसेवारी घोषित होताच केंद्रीय पथकाकडून मंगळवारीच फेरपाहणी करण्यात आली. त्यामुळे सोयगाव तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सोयगाव  (जि.औरंगाबाद) ः तालुक्‍यात खरिपाच्या पिकांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी 75 टक्के असल्याची घोषणा महसूल विभागाने मंगळवारी (ता. एक) केली. दरम्यान, नजर अंदाज पैसेवारी घोषित होताच केंद्रीय पथकाकडून मंगळवारीच फेरपाहणी करण्यात आली. त्यामुळे सोयगाव तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्‍याची खरिपाची पेरणीयोग्य 40 हजार 546 हेक्‍टर क्षेत्रातील पीक कापणी प्रयोगातून हाती आलेली सरासरी पैसेवारी 75 पैसे आहे; परंतु या पैसेवारीनुसार तालुक्‍यात झालेल्या अतिपावसाच्या प्रमाणावरून केंद्रीय पथकाकडून मंगळवारी पुन्हा फेरपाहणी करण्यात आली. ओल्या दुष्काळाच्या निकषात बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने गावनिहाय खरिपाच्या पिकांची पैसेवारी घोषित करून संबंधित ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर पैसेवारी डकविण्यात आली असून गुरुवारपर्यंत (ता.दहा) आक्षेप घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तब्बल 87 महसुली गावांची नजर अंदाज पैसेवारी मंगळवारी घोषित करण्यात आली. बनोटी मंडळातील 14 हजार 769 हेक्‍टरवरील 30 गावांची सरासरी पैसेवारी 75 टक्के, सोयगाव मंडळातील 13 हजार 774 हेक्‍टरवरील 27 गावांची सरासरी पैसेवारी 76 टक्के आणि सावळदबारा मंडळातील 27 गावांची सरासरी पैसेवारी 75 टक्के घोषित करण्यात आली आहे.

त्यामुळे सोयगाव तालुक्‍यातील तिन्ही महसुली मंडळ ओल्या दुष्काळाच्या छायेत आली आहे. तालुक्‍यात सरासरी 864 मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या 150 ते 200 मिमीवर पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर करण्यात येतो, असा शासनाचा निकष आहे. त्यामुळे तातडीने केंद्रीय पथकाकडून पथकप्रमुख नितीशकुमार, तलाठी ज्ञानेश्वर गायकवाड, तोटावार संबंधित गावांचे पोलिस पाटील मुलचंद राठोड आदींच्या पथकाकडून निंबायती आणि जामठी सज्जातील मालखेडा या दोन गावांत केंद्रीय पथकाकडून प्रायोगिक पीक कापणी व पाहणी करण्यात आली.

मदत मिळण्याची शक्‍यता
निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जिल्हाभर नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली. यामध्ये सोयगाव तालुक्‍याची सरासरी पैसेवारी ओल्या दुष्काळाच्या निकषात आली आहे. त्यामुळे तालुक्‍यात शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Estimate Around 75 Percent In Soygaon Block