पेरलं ते उगंना, उगलं ते टिकंना...

बाबासाहेब गोंटे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले. त्यातच आता ज्वारीच्या पिकाबाबत पेरले ते उगवेना आणि उगवले ते टिकेना अशी विदारक अवस्था झाली आहे. 

अंबड -  तालुक्‍यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची फरपट सुरू केली आहे. पावसाळयात पावसाने वेळेत हजेरी लावली नाही. परिणामी खरीप पिकांना फटका बसला. नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले. त्यातच आता ज्वारीच्या पिकाबाबत पेरले ते उगवेना आणि उगवले ते टिकेना अशी विदारक अवस्था झाली आहे. 


पिकांची झालेली स्थिती दाखवताना शेतकरी. 

अनेक पिके गेली हातची 
यंदा परतीच्या पावसामुळे अनेक शेतांतील कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद ही पिके हातची गेली आहेत. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल झाला नाही. दुसरीकडे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार असताना अनेक ठिकाणी ज्वारी, हरभऱ्याच्या पिकाने धोका देण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा : साडेदहा महिन्यांत 84 शेतकरी आत्महत्या 

शेतजमिनीत ओलावा जास्त 
परतीचा पाऊस सतत पडला, अनेक शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप पिके काढून घेतानाही अडचणी आल्या. त्यातच रब्बी हंगामाच्या पेरणीवरही परिणाम झाला. शेतजमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने ज्वारीचे पीक पिवळे पडू लागले. त्यामुळे अनेक पिकांनी माना टाकल्या. अजूनही स्थिती तशीच असल्यामुळे मुळ्या सडल्यामुळे ज्वारीची वाढ होत नाही, अथवा पीक टिकत नसल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. 

हेही वाचा : गहाण जमिनी सावकाराच्या नावावर, मदत कशी मिळणार 

दुबार पेरणीचीही तयारी 
अनेकांनी ज्वारी मोडून गहू, हरभरा पेरणीची लगबगही सुरू केली आहे. दुसरीकडे शेतात असलेल्या कपाशीच्या पिकालाही यंदा जेमतेम कापूसच लगडलेला असल्याने उत्पादन आणि उत्पन्न अशा दोहोंवर परिणाम होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crops badly affected in Jalna District