निसर्गाच्या कोपाने पिके गेली पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

निसर्गाचा कोप झाल्याने तालुक्‍यातील हजारो हेक्‍टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्‍यातील मका, सोयाबीन, कपाशी पिके हातची गेली आहेत. तालुक्‍याच्या लागवडीयोग्य असलेल्या 98 हजार 764 हेक्‍टरपैकी खरीप हंगामात लागवड झालेल्या 44 हजार 858 हेक्‍टर मकाचे, 40 हजार 51 हेक्‍टर कपाशीचे तसेच दोन हजार 756 हेक्‍टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.

सिल्लोड, ता.2 (बातमीदार) : निसर्गाचा कोप झाल्याने तालुक्‍यातील हजारो हेक्‍टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्‍यातील मका, सोयाबीन, कपाशी पिके हातची गेली आहेत. तालुक्‍याच्या लागवडीयोग्य असलेल्या 98 हजार 764 हेक्‍टरपैकी खरीप हंगामात लागवड झालेल्या 44 हजार 858 हेक्‍टर मकाचे, 40 हजार 51 हेक्‍टर कपाशीचे तसेच दोन हजार 756 हेक्‍टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकांचे नुकसान याआधीच झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी जेमतेम उडीद, मूग, भुईमूग पिके पदरी पडली होती.

आता मका, सोयाबीन, कापूस या पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नसल्यामुळे ओल्या दुष्काळाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. पिके तर हातची गेली; पण आता जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. सर्वत्र पाणीच पाणी वाहून गेलेले व सडलेला मकाचा चारा यामुळे जनावरांच्या तोंडी काय खाऊ
घालायचे याची चिंता बळिराजाला लागली आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारसह प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. परिस्थितीची पाहणी प्रशासनाकडून होत असताना आता ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्याला
दिलासा देणे गरजेचे आहे. तालुक्‍यात महसूलसह कृषी विभागाचे पथक सकाळपासूनच मंडळातील नुकसानीची पाहणी करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. रात्रीच्या झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील आठही मंडळांत मोठे नुकसान झाले असून, यामध्ये जनावरे दगावण्याबरोबरच दोनशेपेक्षा जास्त घरांची पडझड झाल्याची नोंद तहसील प्रशासनाकडे झाली आहे.

 

पावसाच्या जोरदार सरी सुरूच

रात्रीच्या पावसानंतर दिवसभरही टप्प्याटप्प्याने शहरासह तालुक्‍यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शहरात संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास काळ्याकुट्ट ढगांचा विळखा बघावयास मिळाल्यामुळे रात्रीतून जोरदार पाऊस कोसळण्याची
भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops Destroyed In Posh Monsoon Showers