अंबाजोगाईच्या योगेश्‍वरी देवी मंदिरात गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम 

अंबाजोगाई (जि. बीड) -प्रसिद्ध शक्तिपीठ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी (ता. 29) सकाळी दहाला घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार व योगेश्‍वरी देवल समितीचे अध्यक्ष संतोष रुईकर व त्यांच्या पत्नी कमल रुईकर यांनी योगेश्‍वरी देवीची विधीवत महापूजा केली. यानंतर योगेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. 

29 सप्टेंबर ते आठ ऑक्‍टोबरदरम्यान श्री योगेश्‍वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. रविवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापूजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रुईकर दांपत्याने देवीची विधीवत महापूजा केली. देवल समितीचे सचिव भगवानराव शिंदे, विश्‍वस्त अक्षय मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, ऍड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी, तलाठी नाना लाड, पुरोहित, मानकरी यांच्यासह भाविक उपस्थित होते. घटस्थापनेनंतर श्री योगेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली. 

विविध धार्मिक कार्यक्रम 
श्री योगेश्‍वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम सुरू झाले आहेत. रविवारी येथे सहयोग महिला भजनी मंडळ, सोमेश्‍वर महिला भजनी मंडळ, संकटमोचन महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, बाल कलापथक भजनी मंडळाच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष श्रीकिसन महाराज पवार यांचे कीर्तन झाले. त्यांना वादनासाठी श्रीनिवास जगताप, प्रवीण सलगर, व्यंकट धायगुडे, दामू भालेकर, माणिक तळणीकर, दीपक अदाटे, मुकुंद पवार यांनी साथसंगत केली. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या व खासदार मीनाक्षी लेखी यांनी योगेश्‍वरीचे दर्शन घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds at the Yogeshwari Devi Temple in Ambajogai