संचारबंदीमुळे जालन्यात पसरला सन्नाटा 

उमेश वाघमारे 
Friday, 29 May 2020

जालना शहर शुक्रवारी (ता.२९)  कडकडीत बंद होते. तर चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. दरम्यान अंबड चौफुली येथे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. 

जालना -  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची शतकपूर्ती झाल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात तीन दिवसाचे संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जालना शहर शुक्रवारी (ता.२९)  कडकडीत बंद होते. तर चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. दरम्यान अंबड चौफुली येथे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ता. २२ मार्चपासून केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाउन लागू केले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधित लोटल्यानंतर जालना जिल्हा नॉन रोडझोनमध्ये असल्याने शासनाच्या निर्देशानुसार ता. २२ मेपासून शहरासह जिल्ह्यात सर्व दुकाने व बाजार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधित सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. तसेच जिल्हाअंतर्गत दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकी वाहनांसह बससेवा ही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू करण्यात मुभा दिली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत गेली. तर दुसरीकडे मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची रोजच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला होता. 

हेही वाचा :  तहसीलदाराला भोवली रेडझाेनमधून ये-जा

कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारपासून तीन दिवसांचे संचार बंदीचे आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.२९) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

दरम्यान सकाळी काही काळ गांधी चमन येथे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले. 
दरम्यान शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अंबड चौफुली येथे शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक कामासाठी आलेल्या नागरिकांनाच पोलिसांकडून शहरात प्रवेश देण्यात आला. या संचारबंदीच्याआदेशानंतर तर कोरोनाच्या प्रादूर्भावाला ब्रेक लागेल अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew in Jalna

Tags
टॉपिकस