नोटबंदीच्या केमोथेरपीत चांगल्यांचेही मरण - चेतन भगत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

औरंगाबाद - 'देशात केलेली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदी ही केमोथेरपी आहे. काळा पैसारूपी कर्करोगाला रोखण्यासाठी केमोथेरपीप्रमाणे वाइटासोबत चांगल्या पेशीही जाळल्या जात आहेत,' अशी खरमरीत टीका लेखक चेतन भगत यांनी रविवारी (ता. चार) केली.

औरंगाबाद - 'देशात केलेली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदी ही केमोथेरपी आहे. काळा पैसारूपी कर्करोगाला रोखण्यासाठी केमोथेरपीप्रमाणे वाइटासोबत चांगल्या पेशीही जाळल्या जात आहेत,' अशी खरमरीत टीका लेखक चेतन भगत यांनी रविवारी (ता. चार) केली.

गुरुकुल क्‍लासेसच्या वतीने रविवारी (ता. चार) आयोजित लक्ष्य या कार्यक्रमात "हाऊ टु बी ए सुपर अचिव्हर' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत देशाच्या शिक्षण पद्धतीवर चर्चा केली. कर्करोग शरीरात फोफावला, की त्याला रोखण्यासाठी केमोथेरपीचा मार्ग अवलंबला जातो. त्यात कर्करोगाच्या वाईट पेशी तर जळतातच, शिवाय काही चांगल्या पेशीही जळतात. देशात लागू करण्यात आलेली नोटबंदी ही केमोथेरपीसारखीच भयंकर आहे. यातून चांगले होईल असे वाटते; मात्र त्यासाठी चांगल्यांचेही मरण होते आहे, याकडेही लक्ष हवे.

हातावर पोट असलेल्यांना याचा सर्वांत जास्त फटका बसला. हातावर पोट असल्याने त्यांना पैशांची निकड प्रचंड असते. हाती असलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मग ते दलालांचा सहारा घेतात. या निर्णयामुळे दलालांचे उखळ पांढरे होत असल्याची टीकाही त्यांनी केली. आपल्या पैशांसाठी लोकांनी लावलेल्या रांगांना देशभक्तीशी जोडणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. लोक त्रस्त आहेत. महिना उलटला तरी सारे काही सुरळीत होत नसेल, तर या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगली करता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया देशाचा चेहरा दाखवतो
सोशल मीडियावरून देशाचे चेहरा दिसतो. समाजात द्वेष पसरवणाऱ्या आणि वातावरण बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुळात जे आहे, तेच सोशल मीडियावर दिसते. असे घडते; कारण आपण पुढच्या माणसाचे अनुकरण करतो आणि स्वतंत्र विचार ठेवत नाही. आपले विचार स्वतंत्र ठेवले तर अशा गोष्टी घडणार नाहीत, असेही चेतन भगत यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात बदलाची गरज
वीस वर्षांपूर्वी असलेली शिक्षण पद्धती आजही कायम आहे. प्रशिक्षण आणि कौशल्य देणाऱ्या नव्या पदव्यांचा अभ्यासक्रम आता अस्तित्वात यायला हवा. वीस वर्षांपूर्वी असलेली महाविद्यालयांची शिकवण्याची पद्धतही बदललेली नाही. ही अस्तित्वात असलेली पद्धत रोजगाराभिमुख नाही. रोजगाराभिमुख शिक्षण आणि कौशल्य देणारी "हायब्रीड' पदवी देणारी शिक्षण पद्धती आता अस्तित्वात यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: currency ban death of chemotherapy good people