अकाउंट फुल्ल पण हातात भोपळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

एटीएममधील रक्कमही संपली, नागरिक चिंतित

औरंगाबाद - शहरातील बॅंकांमध्ये शनिवारी (ता.3) रोकड संपल्याचे फलक लागल्याने शहरवासीयांचा चांगलाच हिरमोड झाला. एक तारीख झाल्याने खात्यात पगार, निवृत्तिवेतन जमा झाले खरे; पण शनिवारी पैसे काढण्यासाठी आलेल्यांच्या हाती भोपळाच पडला.

एटीएममधील रक्कमही संपली, नागरिक चिंतित

औरंगाबाद - शहरातील बॅंकांमध्ये शनिवारी (ता.3) रोकड संपल्याचे फलक लागल्याने शहरवासीयांचा चांगलाच हिरमोड झाला. एक तारीख झाल्याने खात्यात पगार, निवृत्तिवेतन जमा झाले खरे; पण शनिवारी पैसे काढण्यासाठी आलेल्यांच्या हाती भोपळाच पडला.

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्या तेव्हा दिवाळीचा काळ संपला होता. त्यानिमित्ताने पगारही लवकर झाले होते. त्यामुळे गेल्या महिन्यात पगारदार आणि निवृत्तिवेतन धारकांना रांगेत लागण्याची आत्तापर्यंत फारशी गरज पडली नाही. मात्र एक तारखेला झालेले पगार काढण्यासाठी बॅंकांमध्ये आलेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. बॅंकांमध्ये रोकड संपल्याने शनिवारी अनेक ठिकाणी ठणठणाट होता तर काही बॅंकांमध्ये ठराविक रक्कम खातेधारकांच्या हाती टेकवून बॅंकांनी रोकड पुरवली. आता या नोटा पूर्णपणे संपल्याने सोमवारी आलेल्या ग्राहकांना काय द्यायचे, यावर शनिवारी बॅंकांमध्ये खल सुरू होता. खातेधारकांच्या हाती सध्या रोकड नसल्याने गरजेपुरते पैसे देण्यासाठीही बॅंका असमर्थ ठरत आहेत. पगार झाल्याने नोकरदार वर्ग शनिवारी मोठ्या प्रमाणावर बॅंकेत आला होता. मात्र रोकडच नसल्याने आपल्या खात्यातील पैसे त्यांना काढता आले नाहीत.

एटीएममध्ये बदल केले... पण रक्कम?
औरंगाबादेतील एटीएममध्ये असलेल्या जुन्या ट्रेमध्ये नवीन दोन हजारांची नोट बसावी यासाठी काही बदल करणे गरजेचे होते. शहरातील स्टेट बॅंका आणि महाराष्ट्र बॅंकेच्या काही एटीएममध्ये बदल करण्यात आले आहेत. असे असले तरी त्या एटीएममध्ये टाकण्यासाठी रोकडच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील एटीएममध्ये बदल करण्यात आले असले तरी रोकड नसल्याने लोक पुन्हा बॅंकांकडे धावत आहेत.

आधार कार्डाची मागणी
शहरातील बॅंकांमध्ये पैसे नसल्याने शनिवारी निवृत्तिवेतनधारकांना परत फिरावे लागले. पैसे मिळत नसले तरी बॅंकांकडून निवृत्तिवेतनधारकांना आधार कार्डाची मागणी करण्यात आली. बॅंकांमध्ये निवृत्तिवेतनधारकांच्या आधार कार्डाचे लिंकिंग हाती घेण्यात आले असून त्यासाठी ही मागणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र बॅंक शहागंज शाखेचे व्यवस्थापक टी. आर. सुरडकर यांनी सांगितले. याचा वरिष्ठ स्तरावरून रोज आढावा घेतला जात असल्याचे ते म्हणाले.

आमदार इम्तियाज जलील यांनी गाठली हैदराबाद बॅंक
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी शहागंजातील हैदराबाद बॅंकेत जाऊन नागरिकांची विचारपूस केली. यावेळी ज्येष्ठ खातेधारकांनी त्यांच्या कानावर आपले गाऱ्हाणे घातले. मुख्य व्यवस्थापकांशी त्यांनी यावेळी चर्चा केली आणि लोकांनी बसण्याची व्यवस्था आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी बॅंक अधिकाऱ्यांना केली.

Web Title: currency ban effect