नोटाबंदीविरोधात उद्या कॉंग्रेसची दिल्लीत बैठक - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नांदेड - काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस उलटले तरी सर्वसामान्यांचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळेच कॉंग्रेसने या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बुधवारी (त. 11) महत्त्वपूर्ण बैठक होत असून, त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे दिली.

नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. त्या वेळी चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नोटाबंदीने मोदी सरकारने सर्वसामान्यांसह गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे. मोदी यांनी सांगितलेले पन्नास दिवस उलटूनही नागरिकांचा त्रास कमी झालेला नाही. उद्योगधंदे मंदीत असून, देश आर्थिक दिवाळखोरीकडे जात आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी कॉंग्रेसतर्फे राज्यात आंदोलन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: currency ban oppose Congress meeting tomorrow in Delhi