महिन्यानंतरही नोटांचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

बॅंकांसमोरील रांगा, एटीएममधील खडखडाट कायम 
बीड - नोटाबंदीला गुरुवारी (ता. आठ) एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील अर्थचक्र पूर्णत: कोलमडलेले आहे. शेतातील रब्बीचे कामधंदे सोडून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागतच आहेत. बंद झालेल्या नोटांचा बॅंकेतील आकडा दोन हजार कोटी रुपयांच्या घरात गेला असून या काळात केवळ बॅंकांना चलनातील दीडशे कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे एटीएममध्येही खडखडाटच आहे.

बॅंकांसमोरील रांगा, एटीएममधील खडखडाट कायम 
बीड - नोटाबंदीला गुरुवारी (ता. आठ) एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील अर्थचक्र पूर्णत: कोलमडलेले आहे. शेतातील रब्बीचे कामधंदे सोडून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागतच आहेत. बंद झालेल्या नोटांचा बॅंकेतील आकडा दोन हजार कोटी रुपयांच्या घरात गेला असून या काळात केवळ बॅंकांना चलनातील दीडशे कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे एटीएममध्येही खडखडाटच आहे.

गेल्या महिन्यात आठ नोव्हेंबरला केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. दरम्यान, या महिन्यात जिल्ह्यातील हैदराबाद बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आदी बॅंकांच्या ग्राहकांनी हजार व पाचशे रुपयांच्या स्वरूपात साधारण दोन हजार कोटी रुपये जमा केले आहेत; मात्र या महिन्यात जिल्ह्यात केवळ दीडशे कोटी रुपयांच्याच चलनातील नोटा आल्या आहेत. 

रांगेत उभे राहण्याचेच काम
जुन्या नोटा बंद झाल्यानंतर दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आली आहे. ही नोट ग्राहकाला मिळाली तरी सुट्या पैशांअभावी खरेदीवर मर्यादा येत आहेत. किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सुटे पैसे मिळत नसल्याने दोन हजार रुपयांची नोट कशी खर्च करावी हा प्रश्‍न लोकांपुढे आहे. पैसे काढण्यासाठी पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या रांगा महिन्यानंतरही कायमच आहेत. चलनातून नोटा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यासाठी १८० कोटी रुपयांच्या चलनातील नोटा आल्या होत्या. त्यातील आतापर्यंत साधारण दीडशे कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. सध्या बहुतेक बॅंकांकडे ग्राहकांना देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटाही उपलब्ध नसल्याचे चित्र ग्रामीण शाखांमध्ये दिसत आहे. त्यामुळे शेतीची कामे सोडून दिवसभर रांगेत बसूनही शेतकऱ्यांना पैसे मिळतील याची शाश्‍वती नाही.

ग्रामीण भागात अडचणींची भर
ग्रामीण भागांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखा आहेत. नोटा बंदीनंतर या बॅंकेच्या ५० शाखांत साधारण दोनशे कोटी रुपयांचा भरणा झाला आहे; पण वाटप करण्यासाठी बॅंकेला केवळ साडेबारा कोटी रुपये मिळाले आहेत. यातील नऊ कोटी रुपये करन्सी चेस्ट असलेल्या हैदराबाद स्टेट बॅंकेने दिले, तर उर्वरित रक्कम बॅंकेने वरिष्ठ कार्यालयाकडून उपलब्ध करून घेतली. या बॅंकेला चलनातील नोटा कमी मिळत आहेत. लाख-दोन लाख रुपयांच्या चलनासाठी अंबाजोगाई, आष्टी अशा शंभर किलोमीटरहून बीडपर्यंत यावे लागते. आधीच तीन कर्मचाऱ्यांवर शाखा चालविणाऱ्या या बॅंकेचे दोघे चलन आणण्यात गुंततात, तर कधी वीजपुरवठा खंडित, कधी इंटरनेट कनेक्‍शनमध्ये बिघाड अशा अडचणी येतात. याचा फटका ग्राहकांना बसतो आणि ग्राहकांचा संताप कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. 

सर्व बॅंकांना चलन पुरवठ्याची गरज
हैदराबाद स्टेट बॅंक ही चलन पुरवणारी बॅंक असून त्यांच्या आठ ठिकाणी करन्सी चेस्ट आहेत. तर एखाददुसऱ्या ठिकाणी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्याही आहेत. सर्वांना करन्सी पुरवण्याची जबाबादारी या बॅंकांची आहे; मात्र त्यांच्याकडे उपलब्ध झालेले १८० कोटी रुपये सर्वांना उपलब्ध करून देण्याऐवजी सर्वाधिक रक्कम त्यांनी स्वत:साठीच वापरली आहे. पतसंस्था, जिल्हा बॅंकेत नोटा बदलण्याचे व्यवहार बंद असल्याने सुरू असलेल्या ग्रामीण भागातील इतर बॅंकांना पैसे मिळतील यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

चलन तुटवडा कायमच   
एक महिन्यात हजार-पाचशेंनी जमले दोन हजार कोटी
महिन्यात आले केवळ दीडशे कोटी

Web Title: currency shortage after month