ऐन लग्नसराईमध्ये चलन तुटवड्याचा फटका

ऐन लग्नसराईमध्ये चलन तुटवड्याचा फटका

उस्मानाबाद - ऐन लग्नसराईमध्ये चलन तुटवड्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. शहरातील बहुतांश एटीएमची तिजोरी रिकामी असून, बॅंकेमध्येसुध्दा कॅश नसल्याचे सांगितले जात आहे. शहरातील अनेक शाखांत पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना मोठी रकमेची स्लीप भरल्यानंतर निम्मीच दिली जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बॅंकेत पैसे भरण्याचे प्रमाणदेखील कमी झाले असून, गेल्या दोन महिन्यांत आरबीआयकडून बॅंकांना आवश्‍यक तेवढा पैसा मिळालेला नाही. तर दुसऱ्या बाजूला पतसंस्था व नागरी बॅंकांमधील व्यवहारही ठप्प झाले आहेत. 

सध्या लग्नसराईमुळे खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे; मात्र गेल्या काही दिवसांत बॅंकेत पैसे असूनही ते मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातही नागरी बॅंका व पतसंस्थांमध्ये तर अधिक अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा अभूतपूर्व चलन तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात नोकरदारांचा पगार बॅंकेत जमा होतो. मात्र आरबीआयकडून चलन उपलब्ध होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास सर्वच बॅंकांच्या एटीएममध्ये खडखडाट असून बहुतांश एटीएम केंद्रांबाहेर नो कॅशचे बोर्ड झळकत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आजवर कोणत्या ना कोणत्या कारणाने चलन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. एटीएममधून आवश्‍यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी सुरू आहे. केवळ बॅंकांच्या प्रमुख शाखा अथवा क्षेत्रीय मुख्यालय असलेल्या परिसरातील एटीएम व्यवस्थित सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरबीआयकडून कधी पैसे येतील हे सांगणे सध्या तरी कठीण असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

एका मशीनमध्ये लाखो रुपये भरुनही अवघ्या काही तासात हे एटीएम रिकामे होत आहेत. सर्व बॅंकांकडून दररोज आरबीआयला चलनाबाबत अहवाल पाठवण्यात येत आहे. त्यामुळे दररोज प्रत्येक जिल्ह्यात किती चलनाचा पुरवठा झाला, त्यातून किती चलनाचे जनतेत वितरण झाले याचा तपशील आरबीआयकडे उपलब्ध आहे.

सद्य:स्थितीत चलन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने नागरिकांना पैशाची निकड आहे. पतसंस्थांना तर पैसेच मिळत नसल्याने व्यवहार बंद असल्याचे चित्र आहे. त्यातही चलन कधीपर्यंत येईल याचीही कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. 
- विक्रम पाटील, चेअरमन, डॉ. पद्मसिंहजी पाटील पतसंस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com