PHOTOS : सायकलपटू चरणजित एक तप होते चाळीसगाव घाटाचा राजा

अतुल पाटील
सोमवार, 9 डिसेंबर 2019

चोवीस तासात तीन जिल्ह्यातील पाच स्पर्धेत सहभाग नोंदवून पाचही ठिकाणी प्रथम येण्याची साधलेली किमया. सलग बारा वर्षे म्हणजे एक तप चाळीसगाव घाटातील स्पर्धा जिंकल्याने चाळीगाव घाटाचा राजा हा किताब. भारतीय बनावटीची विदाऊट गिअर रॉयल हंटर ते विदेशी बनावटीच्या सर्वात महागड्या ट्रिक कंपनीच्या सायकलीपर्यंतचा 23 वर्षांचा प्रवास.

औरंगाबाद - चोवीस तासात तीन जिल्ह्यातील पाच स्पर्धेत सहभाग नोंदवून पाचही ठिकाणी प्रथम येण्याची साधलेली किमया. सलग बारा वर्षे म्हणजे एक तप चाळीसगाव घाटातील स्पर्धा जिंकल्याने चाळीगाव घाटाचा राजा हा किताब. भारतीय बनावटीची विदाऊट गिअर रॉयल हंटर ते विदेशी बनावटीच्या सर्वात महागड्या ट्रिक कंपनीच्या सायकलीपर्यंतचा 23 वर्षांचा प्रवास. या प्रवासात चारशे सायकल स्पर्धेत नोंदविलेले सहभाग. ही गोष्ट आहे, सायकलपटू चरणजीत सिंग यांची.

14व्या वर्षी स्पर्धा 21 किलोमीटरशी

चरणजीत सिंग यांनी सायकलिंगला सुरवात केली ती, 8 सप्टेंबर 1995ला. लियोन क्‍लबच्या पहिल्या वाहिल्या सायकल स्पर्धेत सहभाग नोंदविला. तेव्हा वय 14 वर्ष आणि स्पर्धा होती 21 किलोमीटरची. ती स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकल्याने आत्मविश्‍वास उंचावला. याच स्पर्धेत त्यांना मोठे सायकपटू भेटले, जे राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवायचे. भाऊसाहेब मोरे व अब्दूल हे दोघे. ज्यांनी चरणजीत सिंग यांना सायकलचे महत्व सांगितले. त्यांच्यासोबतच सायकलिंगचा सराव सुरु केला.

Image may contain: 1 person, bicycle, outdoor and nature

आठवणीतील चाळीसगाव घाट

शाळेत असताना चरणजीत सिंग प्रथम क्रमांक पटकवायचे. खुल्या गटातही नंबर पहिल्या तीनमध्येच असायचा. सायकल स्पर्धा घेण्यासाठी जेव्हा गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड याठिकाणी जायचे तेव्हा ये - जा सायकलवरुन करत होते. चाळीसगाव घाटाचा राजा ही सायकल स्पर्धा संपल्यानंतर तर, दरवर्षी सायकल वरच औरंगाबाद गाठायचे. सोबत औरंगाबादचे स्पर्धकही असायचे.

Image may contain: bicycle and outdoor

एक दिवस, तीन जिल्हे, पाच स्पर्धा

1999मध्ये 24 तासात परभणी, नांदेड, औरंगाबाद या तीन जिल्ह्यात पाच स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावण्याची किमया साकारली. यात दोन राष्ट्रीय आणि तीन राज्य पदक होती. 2001 मध्ये सुमनांजली हॉस्पिटलतर्फे स्टेज रेस ही अकराशे किलोमीटरची सायकल स्पर्धा ठेवली होती. जशी टूर डी फ्रान्स सायकल रेस होती तशी. यातील पाचशे स्पर्धकांपैकी 100 स्पर्धकांजवळ विदेशी बनावटीच्या सायकली होत्या. त्यावेळी चरणजीत यांच्याकडे भारतीय बनावटीची रॉयल हंटर होती. ताशी 40 किलोमीटरचे स्पीड असलेल्या त्या सायकलवर त्यांनी तिसऱ्या क्रमांक पटकावला. पाच दिवस रोज अडीचशे किलोमीटर सायकल चालवायची, अशी ती स्पर्धा होती. 2000साली "सकाळ'तर्फे घेतलेल्या आंतरशालेय सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याची आठवण त्यांनी सांगितली.

Image may contain: 1 person, beard, sunglasses and close-up

स्वत:च तयार केली बांबूची सायकल

आफ्रिका आणि केनियासह विदेशात बांबूपासून तयार केलेली सायकल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात 35 ते 40 हजारला मिळणारी बांबूची सायकल चरणजीत सिंग यांनी घरीच तयार केली. तीही अवघ्या चार हजार रुपयात. भरीव असे ओले पाच बांबू आणले. घरीच कटरने अचूक मोजमाप घेऊन कापले, त्यानंतर त्याला सायकलचे काही पार्ट लावले. यातून ही खास सायकल तयार झाली.

हेही वाचा : ऐकावे ते नवलच, औरंगाबादेत चक्‍क भिंतच हरवली 

संघटनेतर्फे निघते सायकलराईड

चरणजीत सिंह यांनी औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेची स्थापना 2009 मध्ये केली. संघटनेत सचिव म्हणून काम करत असताना वाहनांसाठी फायनान्स करण्याचेही काम करत आहेत. संघटनेतर्फे दर रविवारी सायकल राईड किंवा सायकल स्पर्धा काढण्यात येते. चरणजीत सिंग यांच्याकडे विदेशी बनावटीच्या 10 सायकली आहेत. गरजू सायकलपटूंना त्या वापरण्यास देतात. होम ट्रेनर तयार केले असून वेळेअभावी घरीच सायकलिंग करत आहेत.

जाणून घ्या - मोहंमद तुघलकासोबत आलेली  ती बनली औरंगाबादकरांची लाडकी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Cyclist Charanjit Was King Of Chalisgaon Ghat