जालना जिल्ह्यात आता रोजच कोम्बिंग ऑपरेशन 

उमेश वाघमारे 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

जालना - पोलिस प्रशासनाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अनेकदा कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाते; परंतु याची चाहूल लागल्यानंतर संशयित फरारी आरोपींकडून पळ काढला जातो. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने रोज रात्र गस्तीसोबतच कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जालना - पोलिस प्रशासनाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अनेकदा कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाते; परंतु याची चाहूल लागल्यानंतर संशयित फरारी आरोपींकडून पळ काढला जातो. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने रोज रात्र गस्तीसोबतच कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

 
पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या रात्र गस्तीच्या पद्धतीमध्ये पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि पोलिस ठाणेस्तरीयसह स्थानिक गुन्हे शाखेची विशेष रात्र गस्त असणार आहे. ही रात्र गस्त सशस्त्र असून रेकॉर्डवरील फरारी, हिस्ट्रीशीटर्स, गुन्हेगार वस्त्यांची पोलिसांकडून झाडाझडती होत आहे. विशेष म्हणजे रात्र गस्तीवरील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्येक तासाला आपले लोकेशन द्यावे लागत आहे. 

रात्र गस्तीदरम्यान धार्मिकस्थळ, महापुरुषांचे पुतळे, बॅंक, एटीएम, रेल्वेस्थानक, बसस्थानक यांना भेट देऊन त्यांची तपासणी रजिस्टरमध्ये नोंद केली जात आहे; तसेच अचानक नाकाबंदीही करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून जिल्ह्यात रात्र गस्तीदरम्यान रोजच कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

उपविभागीय अधिकारी करणार तपासणी 
रात्र गस्तीदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी हे पोलिस ठाण्याअंतर्गत रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे चेकिंग करणार आहेत. त्यांचे लोकेशन घेऊन तेथे अचानक भेट देणार आहेत. जर पोलिस अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळून आल्यास त्यांचा अहवाल तत्काळ पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे रात्र गस्तीत टाळाटाळ केल्यास पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. 

रोज द्यावा लागणार अहवाल 
रात्र गस्तीवरील पोलिस अधिकारी, कर्मचारी हे सशस्त्र गणवेशात असतील. शासकीय वाहनांचाच वापर करतील. प्रत्येक तासाचे लोकेशन नियंत्रण कक्षाला देतील. रात्र गस्तीदरम्यान सर्व हॉटेल, बार, वेळेत बंद होतात की नाही हे चेक करतील; तसेच रोजच्या रात्र गस्तीचा स्वतःचा अहवाल प्रत्येक अधिकारी, कर्मचारी देणार आहेत. 

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी रात्र गस्त करणे गरजेचे आहे. त्यानुसार सशस्त्र गस्त सुरू केली आहे. केवळ वाहनांतून न फिरता गुन्हेगार वस्त्यांसह फरारी आरोपी, अनेकदा गुन्हे नोंद झालेले सराईत गुन्हेगार यांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे; तसेच रात्र गस्तीच्या कामाचा अहवालही प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहे. 
- चैतन्य एस., 
पोलिस अधीक्षक, जालना. 
----- 
पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या सूचनेप्रमाणे सशस्त्र रात्र गस्त सुरू केली आहे. रात्र गस्तीदरम्यान रेकॉर्डवरील आरोपींचाही शोध घेतला जात आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांना रात्र गस्तीचे कर्तव्य देण्यात आले आहे. 
- राजेंद्रसिंह गौर, 
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily combing operation now in Jalna district