भराव फुटलेले बंधारे पुन्हा जलमय

अरुण ठोंबरे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

केदारखेडा (जि. जालना) -  परतीच्या पावसानंतर आलेल्या पुरामुळे गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्यावरील विविध भराव ढासळले, वाहून गेले. परिणामी बंधाऱ्यात पाणी साचत नसल्याने भराव पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून भरावात मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे तांदुळवाडी, जैनपूर कोठाळा आणि बेलोरा येथील बंधाऱ्यांत पुन्हा जलसाठा वाढला आहे.

केदारखेडा (जि. जालना) -  परतीच्या पावसानंतर आलेल्या पुरामुळे गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्यावरील विविध भराव ढासळले, वाहून गेले. परिणामी बंधाऱ्यात पाणी साचत नसल्याने भराव पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून भरावात मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे तांदुळवाडी, जैनपूर कोठाळा आणि बेलोरा येथील बंधाऱ्यांत पुन्हा जलसाठा वाढला आहे.

भोकरदन तालुक्‍याला दुष्काळाचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यातही यंदा तालुक्‍यात अनेक ठिकाणी पावसाने प्रारंभीपासून चांगली हजेरी लावली; मात्र केदारखेड्यासह परिसरातील गावांत समाधानकारक पाऊस नव्हता. त्यामुळे गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्यातही पुरेसा पाणीसाठा नव्हता. परतीच्या जोरदार पावसानंतर केदारखेडाप्रमाणेच तांदुळवाडी, जैनपूर कोठाळा आणि बेलोरा येथील बंधाऱ्यांत चांगले पाणी जमा झाले. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्‍त होत होते; मात्र नंतर नदीला आलेल्या पुरामुळे बंधाऱ्याचे भराव वाहून गेले. पाणीही थोडेबहुत शिल्लक राहिले.

Image may contain: one or more people, sky, outdoor, nature and water
बेलोरा येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून पूर्ववत केलेला गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्याचा भराव.

बंधाऱ्याचे भराव मुरूम टाकून पूर्ववत
बंधाऱ्याचे भराव फुटल्यामुळे येणारे पाणीही वाहतच राहिले. अशा स्थितीत पाणी शिल्लक राहणे कठीण असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसहभागातून बंधाऱ्याचे भराव मुरूम टाकून पूर्ववत करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. त्यासाठी जेसीबी, ट्रकच्या साहाय्याने मुरूम पसरविण्यात आला. ग्रामस्थांनीही श्रमदान केले. त्यामुळे तांदुळवाडी, जैनपूर कोठाळा आणि बेलोरा येथील बंधाऱ्यांत पुन्हा जलसाठा वाढला आहे. 

हेही वाचा : या हो साहेब, आता वाजले की बारा !

जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले कौतुक 
दरम्यान, ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कौतुक केले. या ग्रामस्थांचा विशेष सत्कारही त्यांनी केला. यावेळी जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी गिरवरसिंग, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, भासणे, अंबादास सहाने, तांदुळवाडी येथील भगवान चिकटे, शेषराव सांवत, रामराव खरात, ज्ञानेश्वर खरात, बेलोरा, उत्तमराव शिंदे, उत्तमराव सहाने, दीपक साबळे, विठ्ठलराव पाबळे, गजानन पाबळे, शालिकराव कोल्हे, जैनपूर कोठाळाचे बाबूराव सोनवणे, हरिदास कोठाळे, बिसन जाधव, आप्पासाहेब कोठाळे, एकनाथ रोडे, मच्छिंद्र सोनवणे, सुभाष कोठाळे, रत्नाकर रोडे आदींची उपस्थिती होती.

ग्रामस्थांनी लोकसहभागातून वाहून गेलेला भराव भरला. हे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्यात जलसाठा वाढला. यामुळे परिसरातील सिंचनातही भर पडणार आहे.
- आर. के. जाधव,
उपविभागीय अधिकारी, जलसंधारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dam Repair by Villager in Jalna district