आठ धरणे अजूनही तहानलेलीच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मराठवाड्यात जुलैच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. ०.८० टक्‍क्‍यांपर्यंत खाली गेलेला मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑगस्टच्या सुरवातीला ३.२० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील अकरा धरणांपैकी आठ धरणांत उपयुक्‍त जलसाठाच नाही.

औरंगाबाद - मराठवाड्यात जुलैच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. ०.८० टक्‍क्‍यांपर्यंत खाली गेलेला मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑगस्टच्या सुरवातीला ३.२० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील अकरा धरणांपैकी आठ धरणांत उपयुक्‍त जलसाठाच नाही. 

जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसानंतर जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा १४.१८ टक्‍क्‍यांवर आला. नांदेड जिल्ह्यातील निम्न प्रकल्पांमध्ये दहा टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ प्रकल्पांत आठ टक्‍के, बीडमधील १२६, उस्मानाबादमधील २०५ व हिंगोली जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत जिल्हानिहाय केवळ एक टक्‍काच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ५७ व परभणी जिल्ह्यातील २२ लघुप्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही.

नांदेड जिल्ह्यातील ८८ लघुप्रकल्पांत पाच टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये चार टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत पाच टक्‍के, जालना जिल्ह्यातील सात प्रकल्पांत २१ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत एक टक्‍का, तर नांदेड जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांत पाच टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. लातूरमधील आठ, उस्मानाबादमधील १७, तर परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही नाही. 

निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सीना कोळेगाव या धरणांत उपयुक्‍त पाणीसाठा नाही.

३८८ लघु-मध्यम प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील लघु, मध्यम प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. कोरड्या पडलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबाद, बीडमधील प्रत्येकी आठ, जालन्यातील एक, उस्मानाबादमधील दहा प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या असलेल्या लघुप्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ५०, जालना ३९, बीड ९५, लातूर ४६, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३० मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dam Water Storage Rain