वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडले !

उमरगा : वीज पडून तीन जनावरे दगावली ; दाबका गावात मोठे नुकसान
Damage house
Damage houseSakal

उमरगा - उमरगा शहरासह तालुक्यातील अनेक गावांत रविवारी (ता.१५) रात्री नऊच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाने अर्धा तासातच नागरिकांची दैना केली.  मध्यरात्रीपर्यंत अधुन- मधुन पाऊस सुरूच होता. ठिकठिकाणी विज वाहिनीवर झाडे पडल्याने शहरातील बहुतांश भागात वीज गायब होती. दरम्यान तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडून तीन जनावरे दगावली आहेत. कलिंगड, काकडी, भाजीपाला आणि आंबा फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान दाबका गाव, शिवारात झाले आहे.

रविवारी रात्रीच्या वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडले. महामार्गालगत असलेले हॉटेल, दुकानाच्या समोरील पत्रे उडाले. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे, फांद्या कोलमडल्या. उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या पाठीमागील औटी प्लॉटमध्ये वसंत कडाजी माने यांचे ३० पत्र्याचे शेड वाऱ्याने उद्धवस्त झाले. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. याच भागात लक्ष्मण कांबळे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने किरायदार नामदेव जमादार, विष्णू राठोड यांच्या घरातील संसारोपयोगी महागड्या वस्तुचे नुकसान झाले. प्रियंका बालाजी जमादार ही महिला जखमी झाली. दरम्यान शहरात रात्रीपासुन विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहाय्यक अभियंता जयंत जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.

दाबक्यात मोठे नुकसान

पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाले. दाबका गावात अनेक गरिब कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे गावठाणातील बारा आणि शेतीतील अनेक वीजचे खांब वाकले आहेत, झाडे मुळासकट उपटून पडली. माधव पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने जमविलेले साहित्य वाऱ्याने हिसकावून घेतले. हणमंत पवार यांचे गावातील शेड चक्क शेतात पडले. नागराळच्या माणिक गावकरे यांच्या जागलीवरच्या कोट्यावरील व शेडवरील पत्रे वाऱ्याच्या वेगात निघुन गेले.

वीज पडून तीन जनावरे दगावली

मुळज येथील सलीम चाँदसाहेब मासूलदार यांचे एक बैल व कदमापुर येथिल शेतकरी अरूणा शिवाजी नवडे यांची एक म्हैस व एक गाईचा वीज पडून मृत्यू झाला.

" वाऱ्याच्या प्रचंड वेगाने दाबका गाव व शिवारातील वीजेचे खांब पडले आहेत. उमरगा शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे पडल्याने वीज वाहिनी तुटल्या आहेत, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

- राजेंद्र शेंडेकर, उप कार्यकारी अभियंता.

" नैसर्गिक आपत्ती किती भयावह असते, याचे चित्र दिसून आले. अनेक गरिब कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरात पाणी शिरले. प्रशासनाकडून त्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे. वीजेचे खांब पडल्याने गावातील पाणी पुरवठा बंद आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने सक्षम यंत्रणा कामाला लावणे गरजेचे आहे.

- अॅड. हिराजी गायकवाड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com