मराठवाड्यात आज नुकसानीची पाहणी

राजेभाऊ मोगल
Friday, 22 November 2019

  • केंद्राचे पथक दाखल
  • फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड तालुक्‍यांत पाहणी
  • राज्याची सध्याची मदत तुटपुंजी

औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. 22) ते रविवारपर्यंत (ता. 24) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड तालुक्‍यांत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 325 तालुक्‍यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली 16 नोव्हेंबरला बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार, शेतीपिकासाठी प्रतिहेक्‍टरी आठ हजार व बहुवार्षिक फळबागांसाठी प्रतिहेक्‍टरी 18 हजार दराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाने 18 नोव्हेंबरला शासन आदेश दिले. शेतकऱ्यांना देण्यात येणारी ही मदत तुटपुंजी असल्याचे राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्राला कळवून मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळेच तातडीने केंद्र सरकारची समिती राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. 

 

द्विसदस्यीय समिती
मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या द्विसदस्यीय समितीमध्ये डॉ. व्ही. तिरुपुगल व डॉ. के. मनोहरन यांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी विभागीय आयुक्‍तालयात या समितीसमोर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर सादर करतील. त्यानंतरच समिती औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी रवाना होईल. 

असा असेल दौरा 
ही समिती पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांचा दौरा करेल. यामध्ये फुलंब्री तालुक्‍यातील चौका, पाथ्री, महालकिन्होळा, नायगाव, सिल्लोड तालुक्‍यातील गेवराई सेमी, बाभूळगाव, पिंपळगाव पेठ, भराडी, बोरगाव बाजार, कन्नड तालुक्‍यातील आडगाव पिशोर, नाचनवेल, पिशोर, वासडी, हस्ता या ठिकाणी भेट देईल. यानंतर शनिवारी (ता. 23) बीड तर रविवारी (ता. 24) जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करेल. समितीचा दौरा नेमका कसा हे निश्‍चित करण्याचे काम गुरुवारी (ता. 21) सुरू होते. 

कसं काय बुवा? - चक्‍क सेवानिवृत्त आयजीच्या कारवर अंबर दिवा 

असे झाले नुकसान 
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 41 लाख 49 हजार 175.30 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीच्या मदतीसाठी 2,904 कोटी 40 लाख 43 हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी 426 कोटी 33 लाख 79 हजार, जालना 398 कोटी 86 लाख 68 हजार, परभणी 312 कोटी 44 लाख 46 हजार, हिंगोली 188 कोटी 18 लाख 20 हजार, नांदेड 430 कोटी 99 लाख 80 हजार, बीड 514 कोटी 80 लाख 67 हजार, लातूर 356 कोटी 2 लाख 32 हजार, तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अपेक्षित 276 कोटी 74 लाख 52 हजार रुपयांच्या निधीचा समावेश होता. या अपेक्षित निधीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी 819 कोटी 63 लाख 8 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर नुकसानीच्या मदतीत वाढ केली जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 

हेही वाचा- शिवसेनेविरुद्ध तक्रार म्हणजे मुर्खपणाचा कळस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage inspection in Marathwada today