आता दामिनी पथकाची असणार करडी नजर!

सुहास सदाव्रते 
बुधवार, 17 जुलै 2019

- शाळा-महाविद्यालयात मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे.

- यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता तक्रार निवारण समितीसह दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे.

- शिक्षक,पालकांनी सजग राहून गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सूर प्राचार्याच्या बैठकीत बुधवारी (ता.17) उमटला हे विशेष.

जालना : शाळा-महाविद्यालयात मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता तक्रार निवारण समितीसह दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे. शिक्षक,पालकांनी सजग राहून गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सूर प्राचार्याच्या बैठकीत बुधवारी (ता.17) उमटला हे विशेष.

सदर बाजार पोलिस ठाण्याच्या वतीने शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीेचे आयोजन वाहतूक शाखा कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरवडकर,पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पोलिस निरीक्षक काकडे,दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव, उपप्राचार्य काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळा महाविद्यालयात मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. तसेच सोशल मिडीयासह विविध प्रसार माध्यमांच्या वापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. शाळा-महाविद्यालयात किशोरवयातील मुलांच्या होणार्‍या छळाच्या घटनांवर पायबंद घालण्यासाठी आता प्रत्येक ठिकाणी तक्रार निवारण समिती गठित करावी लागणार आहे.

शाळा-महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दरमहा शिक्षक आणि पालकांची बैठक घेणे आवश्यक असून समितीने मुलांच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या आहेत याची शहानिशा करण्यासाठी आता दामिनी पथक प्रत्यक्षात सत्यता तपासणार आहे. शाळा-महाविद्यालयात तक्रार पेटी ठेवणे आवश्यक असून किती तक्रारीचे निवारण केले याची माहितीही ठेवावी लागणार आहे. शिक्षक पालक समितीच्या बैठकामधून कोणते विषय आले याचे स्वतंत्र रजिस्टर ठेवावे लागणार आहेत.

शाळा-महाविद्यालयात शिक्षकांनी मुलांच्या स्मार्ट फोनवर विशेष लक्ष द्यावे अशा सूचनाही पोलिस अधिकारी यांनी दिल्या. शालेय आणि महाविद्यालयीन परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक आल्यास व्यवस्थापनाने परिस्थिती कशी हाताळावी असा सवालही बैठकीत मुख्याध्यापकांनी केला. संस्थाचालक,शिक्षकासह पालकांनी सजग राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्यास गुन्हे घडणार नाही, तर यासाठी प्रयत्न व्हावेत अशा सूचनाही देण्यात आल्या.

''मुलींच्या छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकही तितकेच जबाबदार असले पाहिजे.पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर अधिक लक्ष द्यावे. शाळेत शिक्षक लक्ष देतात पण नंतर मुले कुठून काय शिकून येतील हे आम्ही कसे ठरविणार.''
इंद्रजित जाधव
मुख्याध्यापक,जनता हायस्कूल जालना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damini team will have an eye upon teasers