मोठ्या पावसाअभावी पाणीसाठे अजुनही कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

परभणी, सेलू, पूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येलदरी, लोअर दुधना धरणातील मृतसाठ्यात घट झाली आहे. तर 22 लघु प्रकल्पात अजूनही थेंबभर पाणीसाठा जमा झाला नाही.

परभणी : मोठा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पाणीप्रकल्पांची स्थिती अद्यापही सुधारली नाही. परभणी, सेलू, पूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येलदरी, लोअर दुधना धरणातील मृतसाठ्यात घट झाली आहे. तर 22 लघु प्रकल्पात अजूनही थेंबभर पाणीसाठा जमा झाला नाही.

गतवर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प फारसे भरले नव्हते. तसेच जिल्ह्यातील काही शहरांना पाणीपुरवठा करणारे जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प राहिला. प्रकल्पात पाणीसाठा जेमतेम जमा झाल्याने जानेवारी महिन्यातच अनेक प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा संपला होता. मृत साठ्यावर मागील सहा महिन्यापासून पाणीपुरवठा सुरु आहे. यलदरी धरणाची पूर्ण जलक्षमता 934.44 दलघमी एवढी आहे. 124.670 एवढी मृतसाठ्याची क्षमता आहे. तर जिवंत पाणीसाठ्याची क्षमता 809.770 एवढी आहे. सध्या या धरणात केवळ 101.559 दलघमी मृतपाणी साठा  राहिला आहे. अशीच स्थिती लोअर दुधनाची आहे. दुधना प्रकल्पात 54.12 दलघमी तर सिध्देश्वर प्रकल्पात 56.260 दलघमी पाणीसाठा आहे. मानवत जवळील झरी प्रकल्पातील मृतसाठा संपला आहे.

करपरा मध्यम प्रकल्पात केवळ 0.887 आणि मासोळी प्रकल्पात 2.302 दलघमी पाणीसाठा आहे. तर डिग्रस, मुदगल, ढालेगाव, मुळी हे गोदावरी नदीवरील बंधाऱ्यासह गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी प्रकल्पासह एकूण 22 लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dams in Marathwada are still not filled

टॅग्स