ऐतिहासिक नहर-ए-अंबरीवर पहाटेच्या अंधारात घाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा चुराडा करून भूमिगत गटार योजनेचे काम रेटण्याचा सपाटा अद्याप थांबलेला नाही. दर्गा, बारापुल्ला पूल, हिमायत बागेतील धरणापाठोपाठ आता मंगळवारी (ता. आठ) पहाटे भूमिगत गटारीचे काम करणाऱ्या कंपनीने नहर-ए-अंबरीची कत्तल उडविली.

फाजलपुरा आणि शहागंजला जोडणाऱ्या पुलाची पाडापाडीसुद्धा यादरम्यान पोकलेन आणि ब्रेकर लावून करण्यात आली. महापालिकेच्या या अक्षम्य हलगर्जीमुळे नागरिक, इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भूमिगत गटार योजनेच्या पाइपलाइनचे काम पुढे रेटण्यासाठी कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी शहरातील ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करीत सुटले आहेत. हिमायत बागेच्या निजामकालीन धरणाची भिंत फोडल्यानंतर आता कलेक्‍टर ऑफिसकडून शहागंजमध्ये जाणाऱ्या नहर-ए-अंबरीचे खापरी नळ हे काम करणाऱ्या खिल्लारी कन्स्ट्रक्‍शन कंपनीने मंगळवारी पहाटेच्या अंधारात जेसीबीने उखडून फेकले. फाजलपुरा येथील अफलातून मशिदीजवळील ऐतिहासिक पूल भूमिगत गटार योजनेची लाइन टाकण्यासाठी तोडण्यात आला. या पुलाची अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली चौथी कमान जमीनदोस्त करून ठेकेदाराने पुलाचा पायाच कमकुवत करून टाकला. या पुलाच्या पक्‍क्‍या बांधकामातून ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे नळ गेले आहेत. फुटलेल्या नहरीचे पाणी आता फाजलपुऱ्याच्या नाल्यात वाहू लागले आहे.

Web Title: A dark-amber-morning attack on the Canal