‘गोविंदा’च्या जयघोषात मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - गोविंदा.. गोविंदा.. च्या जयघोषात मंगळवारी (ता. ११) कर्णपुऱ्यात बालाजीची मिरवणूक काढण्यात आली. रथातील बालाजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मंदिरातून निघालेली मिरवणूक पंचवटी चौकातून परत मंदिरात आली.

औरंगाबाद - गोविंदा.. गोविंदा.. च्या जयघोषात मंगळवारी (ता. ११) कर्णपुऱ्यात बालाजीची मिरवणूक काढण्यात आली. रथातील बालाजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मंदिरातून निघालेली मिरवणूक पंचवटी चौकातून परत मंदिरात आली.

शहरात विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मंगळवारी (ता. ११) पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या वाहनांचे आणि अवजारांचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी पाट्या, वह्या-पुस्तकांचे पूजन केले. वाहने, घरे आणि व्यापारी संस्था फुलांच्या माळांनी सजविल्या होत्या. दुपारच्या मिष्टान्न भोजनानंतर सायंकाळी नव्या कपड्यांत दिमाखात नागरिक सीमोल्लंघनासाठी बाहेर पडत होते. ‘सोने’ एकमेकांना देण्याच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेण्याचा उपक्रम त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दसऱ्याच्या निमित्ताने केलेल्या खरेदीच्याही चर्चा होत होत्या.

दसऱ्याच्या दिवशी बालाजीच्या रथाची परंपरा तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे. सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीपूर्वी आरती करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी निधी पांडेय, पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेवक गजानन बारवाल उपस्थित होते. त्यानंतर बालाजीचा रथ कर्णपुऱ्यातून पंचवटी चौकापर्यंत आणण्यात आला. या वेळी मंदिरातील पुजारी रथात होते, तर पदमपुऱ्यातील भाविकांनी रथ ओढला. या वेळी काही नागरिकही रथ ओढण्यास उत्सुक होते. अधूनमधून त्यांना संधी दिली, तर काहीजण रथाची चाके ढकलण्यात धन्यता मानत होते.

रथातून भाविकांना प्रसाद देण्यात येत होता. तसेच फुलांसाठीही भाविकांनी ओढाताण केली. रथ परत मंदिराजवळ आल्यानंतर सुमित वैष्णव यांनी बालाजीची आरती केली. मिरवणूक पुन्हा मंदिरात सव्वाआठला पोचली. रथाला महिला पोलिस, पोलिस आणि पोलिस मित्रांनी मानवी साखळी केली होती. रथामध्ये अनिल पुजारी, प्रभाकर पुजारी, अशोक पुजारी, अभय पुजारी, श्‍याम पुजारी, जयवंत पुजारी, राजेंद्र पुजारी आदींची उपस्थिती होती.

Web Title: dasara celebration in aurangabad

टॅग्स