शहरात ठिकठिकाणी दत्तजयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

दत्तजन्मावर कीर्तन, पारायणाने भाविक भक्तिरसात चिंब
औरंगाबाद - शहरात विविध ठिकाणी दत्तजयंती उत्साहात साजरी झाली. "दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो,' अशा गजर, अभंगांतून भगवान दत्तात्रेयांना आळवत भाविक भक्तिरसात चिंब झाले होते. दत्त मंदिर संस्थानसारख्या मोठ्या मंदिराच्या ठिकाणी स्वयंसेवकांनी भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी सोय केली होती.

दत्तजन्मावर कीर्तन, पारायणाने भाविक भक्तिरसात चिंब
औरंगाबाद - शहरात विविध ठिकाणी दत्तजयंती उत्साहात साजरी झाली. "दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो,' अशा गजर, अभंगांतून भगवान दत्तात्रेयांना आळवत भाविक भक्तिरसात चिंब झाले होते. दत्त मंदिर संस्थानसारख्या मोठ्या मंदिराच्या ठिकाणी स्वयंसेवकांनी भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी सोय केली होती.

औरंगपुरा येथील दत्त मंदिरात सकाळीच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी पाच वाजता घनश्‍याम दीक्षित महाराज यांचे दत्तजन्मावर कीर्तन झाले. सायंकाळी सहाला दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, तसेच रुद्राअभिषेक आदी कार्यक्रम पार पडले. दत्तजयंतीपूर्वी महिला, पुरुष दुपारी 12 ते रात्री 11 पर्यंत भजने होत होती. या भजनांची मंगळवारी सांगता झाली. तसेच महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. गुरुवारी (ता. 15) काला होणार असल्याचे पुजारी बंडू गुरुजी यांनी सांगितले.

हडकोतील जागृत संस्थान दत्त मंदिर येथेही दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

'स्वरविहार' भक्तिगीतांनी भाविकांत उत्साह
संत काशीविश्‍वनाथ बाबा संस्थान, बीड बायपास, देवळाई चौक येथे दत्त जयंतीनिमित्त प्रा. राजेश सरकटे यांचा स्वरविहार भक्‍तिगीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी सहा ते आठ या वेळेत श्री गणेश, रेणुकामाता, भगवान श्री दत्तात्रेय आणि सुवर्णपादुकांची षोडशोपचार पूजा करण्यात आली. त्यांनतर महाभिषेक करण्यात आला. सकाळी नऊपासून सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 12 वाजेपर्यंत चालला. 12 वाजता महाआरती, तसेच महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तो रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहिल्याचे विश्‍वस्त सोपानराव देशमुख यांनी सांगितले. यावेळी श्री संत काशीविश्‍वनाथ बाबांच्या मूर्ती स्थापनेचा 17 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. दरम्यान गुरुचरित्र, सद्‌गुरु माहात्म्य पोथीचे पारायण करणाऱ्यांसाठी मंदिर संस्थानतर्फे व्यवस्था करण्यात आली होती. दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी सोमवारी (ता. 12) सायंकाळी पालखी मिरवणूक, तसेच डॉ. विजयकुमार फड यांचे प्रवचन झाल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: datta jayanti celebration