'नकोशी' जन्माला घातल्याने तिन्ही सुना घराबाहेर हाकलल्या...

file photo
file photo

नांदेड: एकविसाव्या शतकातही रुढी, पंरपरा, मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे अशा चालिरीतींना आजही खतपाणी मिळताना दिसत आहे. तेही सुशिक्षित लोकांकडून. नांदेडमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून चक्क एकाच कुटूंबातील तीन सुनांना घराबाहेर हाकलण्याचा प्रताप केला आहे. या प्रकाराला पतींकडूनही खतपाणी मिळत असल्यानं या तिन्ही पिडीत महिलांनी नांदेडच्या जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षात दाद मागितली आहे.

मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकार मुलींसाठी विविध शासकीय सोई सुविधा व योजना आणत आहे. परंतू वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे असे म्हणणा-यांचा वर्गही आज दिसत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केला जात आहे. कांही ठिकाणी मुलगी जन्मली म्हणून हत्तीवरुन साखर वाटणे, गाव जेवन देणे, पेढे वाटण्याच्या घटनाही सुखदं आहेत. परंतू मुलगी जन्मली म्हणून तिला नकोशी करणे ही बाब गंभीरच म्हणावी लागेल. आजतागायत आपण मुलगी जन्मली म्हणून सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचं ऐकत होतो मात्र, नांदेडच्या चौफाळा भागातील एका कुटूंबांने आपल्या तिन्ही सुनाला मुलगीच झाली म्हणून चक्क घराबाहेर हाकलले आहे....या धक्कादायक प्रकारामुळे या तिन्ही महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.

सुशिक्षित असलेल्या एकाच कुटूंबातील तीन भावांचे लग्न ठरावीक अंतराने झाले. त्यात हदगाव तालुक्‍यातील चाभरा,दिग्रस व राणीसावरगाव या ठिकाणच्या मुलींसोबत तिन्ही भावांचे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगविणा-या आणि मुलीचं आयुष्य सुखकर होईल असे स्वप्न पाहणा-या मुलींच्या पदरी मात्र, मुलगी जन्मताच त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखविण्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. तिघींपैकी दोघीजणींचे पती हे शासकिय कर्मचारी आहेत. आमचे कोणीच काही करु शकत नाही अशी धमकी हे पिडीत महिलांच्या कुटूंबियांना देत असल्याचे या महिलांनी व त्यांच्या पालकांनी सांगितले. आम्हाला न्याय देण्यात यावा यासाठी आम्ही तिघींजणी शेवटपर्यंत लढणार असल्याचे 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

एकीकडे मुलगा - मुलगी समानतेचा संदेश देण्यात येतो आणि दुसरी कडे मुलगी झाली की तिला नकोशी म्हणून बाजूला केले जाते...नांदेडमध्ये तर चक्क मुलगी तर नकोच परंतू, सुनाही नको म्हणून एकाच कुटूंबातील तिघींना घराबाहेर काढणा-या निर्दयी कुटूंबियावर कडक कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com