देवगिरी किल्ल्याजवळ होणार पर्यायी वळण रस्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

दौलताबाद/औरंगाबाद - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या सातव्या तटबंदीमधील दिल्ली दरवाजातून एका वेळी एकच वाहन जात असल्याने वाहतूक ठप्प होऊन पर्यटक, भाविकांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. 

दौलताबाद/औरंगाबाद - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या सातव्या तटबंदीमधील दिल्ली दरवाजातून एका वेळी एकच वाहन जात असल्याने वाहतूक ठप्प होऊन पर्यटक, भाविकांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. 

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय विभागाला पर्यायी चार किलोमीटरच्या पर्यायी रस्त्याचा पाठविलेला प्राथमिक प्रस्ताव मंजूर केला असून, त्यात प्रस्तावित चार किलोमीटरचा हा पर्यायी रस्ता चौपदरी राहणार आहे. त्यासाठी या विभागाने ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाला तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रमुख एस. ई. जोशी यांनी दिली. गेल्या आठवड्यात खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. त्यानुसार या विभागाने ९ नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचेही श्री. जोशी यांनी सांगितले.

या प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, खासदार खैरे यांनी पर्यायी वळण रस्त्याची पाहणी केली होती. त्यात दौलताबाद घाटाखालून गट क्रमांक ११, १२, ३७ मधून अब्दीमंडी गावाजवळ औरंगाबादकडे हा एकेरी वळण रस्ता तयार करावा व या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे ८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सार्वजानिक बांधकाम विभागाने तयार करून गतवर्षी डिसेंबर महिन्यात पर्यायी वळण रस्त्यासाठी पाहणी करण्यात आली होती.

त्यानुसार चार किलोमीटरच्या वळण रस्त्याची गरज असल्याचे लक्षात आले होते. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करून हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते विकास विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. येत्या मे महिन्यापर्यंत जिल्हा प्रशासन जमीन अधिग्रहण करेल अशी अपेक्षा आहे. 

पर्यटक, भाविक, प्रवाशांना मनस्ताप
रीाष्ट्रय महामार्ग क्रमांक २११ हा दौलताबाद किल्ल्याच्या सातव्या तटबंदीमधून जातो. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक व भाविक, पर्यटक यांची नेहमीच वर्दळ असते. या तटबंदीमधील दरवाजाचा रस्ता अरुंद असल्याने एका वेळी एकच वाहन जाते. यामुळे दिवसभर येथे वाहतूक नेहमीच ठप्प होत असते. देश-विदेशातून येणारे पर्यटक, म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबादला सुटीच्या दिवशी जाणारे पर्यटक, श्रावण महिन्यात भद्रा मारुतीला जाणारे भाविक, खुलताबाद येथील उरुसानिमित्त येणारे देशभरातील भाविक यांना वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठा मनस्ताप होतो. ही कोंडी आता फुटणार आहे.

‘सकाळ’मधून या दरवाजातील वाहतुकीची समस्या, पर्यटक, भाविकांच्या गैरसोयीबद्दल छापून येत होते. मी प्रत्यक्ष ही समस्या अनुभवली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याविषयी तत्काळ निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यांनी संबंधित विभागाला लगेच सर्व्हे करून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. होत्या. निधी उपलब्ध करून िदला. तीन-चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
- चंद्रकांत खैरे, खासदार.

या पर्यायी वळण रस्त्यामुळे पर्यटक, भाविक यांची गैरसोय दूर होणार आहे. किल्ल्याचा अविभाज्य भाग असलेली तटबंदी, दरवाजाचेही संवर्धन होईल. हा पुरातन ठेवा जतन केल्यास पुढील पिढीला इतिहास बघता येईल. 
- संजय रोहनकर, कनिष्ठ संरक्षण सहायक, भारतीय पुरातत्त्व विभाग.

Web Title: daulatabad marathwada news Alternate winding road near devgiri fort