नातीला शाळेत सोडून परतणाऱ्या आजोबांचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

दौलताबाद - खुलताबाद येथून औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरून रिक्षाला ठोकरल्यामुळे नातीला शाळेत सोडून परतणाऱ्या आजोबाचा मृत्यू झाला. ही घटना येथील देवगिरी किल्ल्यासमोर मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अपघातात रिक्षाचालक व एक महिला प्रवासी असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

दौलताबाद - खुलताबाद येथून औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरून रिक्षाला ठोकरल्यामुळे नातीला शाळेत सोडून परतणाऱ्या आजोबाचा मृत्यू झाला. ही घटना येथील देवगिरी किल्ल्यासमोर मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अपघातात रिक्षाचालक व एक महिला प्रवासी असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

आजोबा देवराम मालजी पाटील (वय ७१, रा. भद्रा कॉलनी, खुलताबाद) हे खुलताबाद येथून आपली नात अक्षरा (वय चार) हिला नेहमीप्रमाणे चालक बाबासाहेब पवार यांच्या रिक्षामधून (एमएच-२० सीएस-२९२३) दौलताबादपर्यंत घेऊन आले. देवराम पाटील यांचा मुलगा व सून दोघेही पोलिस कर्मचारी असून, मुलगा दौलताबाद व सून खुलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नात अक्षरा ही औरंगाबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकते. दौलताबादहून ती शाळेच्या वाहनातून जाते. अक्षराला दौलताबादेत शाळेच्या वाहनाजवळ सोडून देवराम पाटील खुलताबादला परतत असताना किल्ल्याजवळील वन उद्यानासमोर ट्रकने रिक्षाला समोरून जोराची धडक दिली. यात देवराम बाहेर फेकले जाऊन अवजड वाहनाखाली फरपटत गेले.

घटनेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत देवराम यांचा मुलगा विवेक पाटील हे घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थ सय्यद वसीम, इस्माईल पठाण, जावेद पठाण यांच्या मदतीने वडिलांच्या शरीराचे विखुरलेले अवयव गोळा केले. हे दृश्‍य बघून उपस्थितांना गहिवरून आले. ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली.

विवेक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी तपास करीत आहेत. 

बंदी असतानाही जड वाहतूक
अपघात घडल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोचायला एक तास उशीर लागला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी आहे; परंतु तेथील पोलिस कर्मचारी मोबाईल व्हॅन घेऊन घाटाखाली थांबले होते. त्यांना काही वाहनधारकांनी अपघाताची माहिती दिली; मात्र त्यांनी तत्परता दाखविली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, दौलताबादमार्गे जड वाहतूक बंद असतानाही सर्रास ट्रकसारखी वाहने धावतात. पोलिसांचा धाक नसल्याने अवजड वाहने यामार्गे धावून निष्पाप लोकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे.

Web Title: daulatabad marathwada news death in accident